नाशिकमध्ये मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पातील लिपिकाचा खून; पत्नी माहेरून परतल्यावर उघडकीस आली घटना
By अझहर शेख | Updated: November 1, 2022 23:36 IST2022-11-01T23:35:39+5:302022-11-01T23:36:09+5:30
Crime News: नाशिक - येथील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरीच्या शासकिय वसाहतीत राहणाऱ्या एका कनिष्ठ लिपिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली.

नाशिकमध्ये मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पातील लिपिकाचा खून; पत्नी माहेरून परतल्यावर उघडकीस आली घटना
- अझहर शेख
नाशिक - येथील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेरीच्या शासकिय वसाहतीत राहणाऱ्या एका कनिष्ठ लिपिकाचा मृतदेह संशयास्पदरित्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली. पत्नी माहेरून मंगळवारी (दि.१) घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
संजय उर्फ संतु वसंतराव वायकांडे (३८) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरीच्या शासकिय वसाहतीमधील एका खोलीत पत्नी, दोन मुलांसह वायकंडे हे मागील काही वर्षांपासून वास्तव्यास होते. ते मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी करत होते. दिपावलीनिमित्त त्यांची पत्नी आपल्या मुलांसोबत तीन दिवसांपुर्वी माहेरी गेली होती. मंगळवारी जेव्हा त्यांची पत्नी घरी परतली, तेव्हा ते घरात मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांचा भाऊ व पत्नीने वायकांडे यांना जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी दाखल केल्यानंतर वैद्यिकय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. शवविच्छेदनासाठी वायकांडे यांचा मृतदेह नेण्यात आला.
यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर काही व्रण आढळून आले. त्यामुळे गळा दाबून त्यांचा खून करण्यात आला असावा? अशी श्यक्यताही प्रथमदर्शनी पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेची माहिती मिळताच रात्री पंचवटी पोलिसांसह आयुक्तालयातील सर्वच वरिष्ठ अधिकारी मेरी येथील त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती. वायकंडे यांच्या नातेवाईकांकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा रात्री उशीरा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती उपआयुक्त अमोल तांबे यांनी दिली आहे.