Municipal hammer at London Palace! | लंडन पॅलेसवर महापालिकेचा हातोडा!

लंडन पॅलेसवर महापालिकेचा हातोडा!

नाशिक : अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी चित्रपटात शोभावे असे सेट उभारल्याने चर्चेत असलेल्या पंचवटीतील चव्हाणनगरच्या समोर असलेले ‘लंडन पॅलेस’ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.२८) दुपारी जमीनदोस्त केले. अनेक प्रकारे दबाव आल्यानंतरही महापालिका प्रशासनाने ही कारवाई पूर्ण केली.
आडगाव नाका परिसरात तीन वर्षांपूर्वी लंडन पॅलेस साकारण्यात आले. म्हणजेच खास सेट उभारून त्याठिकाणी विवाह सोहळ्यासाठी भाड्याने दिले जाऊ लागले. वर्षभरापूर्वीच सदरच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत महापालिकेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर नगररचना विभागाने संबंधिताना नोटिसा दिल्या होत्या. त्याठिकाणी मोजमाप केल्यानंतर बेकायदेशीर बांधकामच याठिकाणी झाल्याचे आढळल्याने त्यासंदर्भात अंतिम नोटीसदेखील बजावण्यात आली होती. त्यानंतरही संबंधितांनी अतिक्रमण न हटविल्याने अखेरीस नगररचना विभागाने अतिक्रमण विभागास कारवाईच्या सूचना दिल्या, त्यानंतर बुधवारी (दि.२८) धडक कारवाई करण्यात आली.
लंडन पॅलेसवरील कारवाई बुधवारी (दि.२८) चर्चेचा विषय ठरला. विशेषत: याठिकाणी राजकीय आणि अन्य बड्या प्रस्थांच्या कुटुंबातील अनेक लग्न सोहळे झाले आहेत. तथापि, त्यानंतरदेखील सदरचे बांधकाम बेकायदेशीर आहे किंवा कसे याची कोणतीही कल्पना महापालिकेला आली नाही. गेल्यावर्षी तक्रार आल्यानंतर महापालिका सजग झाली आणि त्यानंतर कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या.
अधिकाऱ्यांना बड्या व्यक्तींचे फोन
महापालिकेने थेट कारवाई सुरू केल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहरातील काही राजकीय आणि अन्य व्यक्तींनी मोबाइलवर संपर्क साधून कारवाई टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु सारखे फोन येत असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी मोबाइलच बंद केला आणि कारवाई झाल्यानंतरच तो सुरू केला.

Web Title:  Municipal hammer at London Palace!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.