महापालिकेने पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:11 IST2018-03-27T01:10:33+5:302018-03-27T01:11:09+5:30
महापालिकेने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून, गतवर्षी याचदरम्यान, २६ कोटी २१ लाख रुपये वसुली झालेली होती. ३१ मार्चअखेर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरपट्टी वसुलीतही महापालिकेने जोर लावल्याने आतापर्यंत ८७ कोटी रुपये वसुली झाल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.

महापालिकेने पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले
नाशिक : महापालिकेने पहिल्यांदाच पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली असून, गतवर्षी याचदरम्यान, २६ कोटी २१ लाख रुपये वसुली झालेली होती. ३१ मार्चअखेर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, घरपट्टी वसुलीतही महापालिकेने जोर लावल्याने आतापर्यंत ८७ कोटी रुपये वसुली झाल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली. महापालिकेने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ४१ कोटी रुपये पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. यंदा कर विभागाकडून पाणीपट्टीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या एक-दीड वर्षापासून रखडलेल्या पाणीबिलांचे वाटप करण्यावर भर दिला. याशिवाय, अनधिकृत नळजोडणीधारकांवरही कारवाई सुरू केली. आतापर्यंत ४२ कोटी ३५ लाख रुपये पाणीपट्टी वसुली झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १६ कोटी १४ लाख रुपये जादा वसुली झाली आहे. पहिल्यांदाच महापालिकेच्या कर विभागाला दिलेले उद्दिष्ट पार झाले आहे. येत्या ३१ मार्चअखेर त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. पाणीपट्टीबरोबरच महापालिकेने घरपट्टी वसुलीतही गत वर्षाच्या तुलनेत प्रगती केल्याचे दिसून येते. आतापर्यंत ८७ कोटी ३९ लाख रुपये घरपट्टी वसुली झाली आहे. मागील वर्षी ८१ कोटी १३ लाख रुपये घरपट्टी वसुली झालेली होती. मागील वर्षाच्या तुलनेत वसुलीच्या टक्केवारीत ५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी कर विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ११० कोटी रुपये देण्यात आले आहे.
जप्तीची मोहीम वेगात
महापालिकेने सहाही विभागांत घरपट्टी थकबाकीदारांविरुद्ध जप्तीच्या मोहिमेला वेग दिला आहे. घरपट्टी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्यानंतर अनेकांच्या मिळकती जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये बऱ्याच मोठ्या थकबाकीदारांचा समावेश आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे काही मिळकतधारकांकडून थकबाकीचा भरणा करण्यासाठी प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत रकमेचा भरणा करता यावा यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आल्याची माहिती कर विभागाकडून देण्यात आली आहे.