- अझहर शेख नाशिक : जंगले टिकविली तर निसर्ग संवर्धन घडून येते; मात्र याच जंगलांमधून आर्थिक सुबत्तेचा मार्गही सापडतो, त्यासाठी गरज असते ती दुर्दम्य इच्छाशक्तीची. नाशिकच्या आदिवासी सुरगाणा तालुक्यातील निंबारपाडा, देवगावातील लोकांनी अशाच पद्धतीने जंगल संरक्षणातूनच समृद्धीचा मार्ग शोधला. वनविभागाच्या साथीने ही गावे आर्थिक समृद्धीकडे स्वावलंबी वाटचाल करीत आहेत.महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेवर सुरगाणा वनपरिक्षेत्रातील निंबारपाडा हे पार नदीच्या काठावर वसलेले आदिवासी दुर्गम गाव आहे. या पाड्याला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे. नाशिक शहरापासून ९६ किलोमीटरवर असलेल्या या गावातील आदिवासी बांधवांनी नाशिक पूर्व वनविभागाच्या मदतीने सुमारे ७० हेक्टर वनजमिनीवर बांबूची लागवड व संवर्धन करीत विकासाचा मार्ग शोधला आहे. दोन वर्षांपूर्वीच या गावाने केवळ दहा हेक्टरवरील बांबूचे हार्वेस्टिंग करीत रोजगार तर मिळविला; मात्र बाजारात बांबूची विक्री करून सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्नही मिळविले होते. या गावात ९३.६५१ हेक्टरवर वनविभागाच्या अखत्यारीत राखीव वन आहे. साग, सादडा, बांबू, आपटा, पळसासारखी वृक्षसंपदा येथील वनात आढळते. ७६३ लोकसंख्येच्या या गावात गावकऱ्यांनी आर्थिक सुबत्तेचा मार्ग जंगल संवर्धनातूनच जातो हे इतरांना पटवून दिले. संयुक्त वनव्यवस्थापन समितीत अध्यक्ष विठ्ठल धूम, पंडित बोरसे, कल्पना पाईकराव हे पदाधिकारी आहेत.
बांबूपासून आकर्षक वस्तूनिंबारपाड्यात वनजमिनीवर लागवड केलेल्या वृक्षांमध्ये २० टक्क्यांपर्यंत बांबू आहे. बांबूपासून बनविलेल्या आकर्षक शोभेच्या वस्तूंची पुणे, नाशिकसारख्या विविध प्रदर्शनांमध्ये येथील आदिवासींनी विक्रीदेखील केली आहे. - तुषार चव्हाण,उपवनसंरक्षक, नाशिक पूर्व
वनसंवर्धनाची ‘त्रिसूत्री’निंबारपाडावासीयांनी स्वयंप्रेरणेतून कुºहाडबंदी, चराईबंदी, शिकारबंदीया त्रिसूत्रीचा अवलंब करीत वनसंवर्धनावर भर दिला.त्यासाठी दररोज गावातून दोन माणसे गस्तीसाठी नेमली. चराईबंदी काटेकोरपणे अमलात आणली.यामुळे गावाला गवताच्या स्वरूपात चांगले वनउपज हाती आले. गवत कापून आणत गावकऱ्यांनी पशुधनाची भूक त्यांच्या गोठ्यातच भागविण्याचा नियम स्वत:ला घालून घेतला.