डोंगरची काळी मैना वेधतेय लक्ष
By Admin | Updated: May 20, 2017 01:14 IST2017-05-20T01:14:15+5:302017-05-20T01:14:37+5:30
वणी :आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाऱ्या व डोंगरची काळी मैना म्हणून परिचित असलेल्या करवंद या फळाचे बाजारपेठेत आगमन झाले

डोंगरची काळी मैना वेधतेय लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी परिचित असलेल्या व आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाऱ्या व डोंगरची काळी मैना म्हणून परिचित असलेल्या करवंद या फळाचे बाजारपेठेत आगमन झाले असून, पळसाच्या पानाच्या द्रोणाबरोबर ग्लासमध्ये करवंद टाकून मापाच्या आधारे विक्र ी करण्यात येत आहे.
साधारणत: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गरिबांचा
मेवा म्हणून परिचित असलेल्या करवंदाचे आगमन होते. झाडही
नाही, वेलही नाही मात्र लहानमोठे झुडुप असलेल्या करवंदाच्या
जाळीला कुरपुड असे म्हणतात. दऱ्या-खोऱ्या व डोंगराळ
भागात आढळणाऱ्या व उष्ण कटिबंधात येणाऱ्या करवंदाची चव चाखण्याची आवड लहानथोरांना असतेच. त्याच्या झुडुपाला लहान आकाराच्या सफेद फुलांचे गुच्छ येतात. याचा सुगंध मादक असतो. मध्यरात्रीनंतर व पहाटेच्या सुमारास मंद सुगंध येतो.
आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला हातभार लावणाऱ्या करवंदाला वर्षातून एकदा बहार येतो. उन्हाची तीव्रता कमी करणाऱ्यऱ्या गोड-आंबट चवीच्या फळात द्विदल त्रिदल तुरीच्या आकारमानाचे बीज असते. विशेष म्हणजे, हे फळ हायब्रीड नाही व त्यावर संशोधन झाल्याचेही ऐकीवात नाही. दिंडोरी तालुक्यातील अहिवंत किल्ला, सुरगाणा तालुक्यातील केमचा डोंगर व कळवण तालुक्यातील रावळा जावळा डोंगराबरोबर सप्तशृंगीच्या पर्वतरांगात करवंदाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आढळते. डोंगराळ भागात माकडांचे वास्तव्य असते.
दुसरी बाब म्हणजे करवंदाचे लाकूड दमदार असल्याने बहर संपल्यानंतर सरपण म्हणूनही त्याचा वापर करण्यात येतो. आदिवासी बांधव करवंदे विक्र ी करून संसारास हातभार लावतात. पळसाच्या पानाचे आकर्षक द्रोण तयार करून गावोगाव फिरून त्याची विक्र ी करतात. करवंद जेव्हा कच्च्या स्वरूपात असतात तेव्हा हिरव्या रंगाच्या करवंदाची चटणी चविष्ट व उष्णतामान कमी करण्यास साहाय्यभूत ठरत असल्याने पाककौशल्यात पारंगत गृहिणीवर्ग ती चटणी बनवतात. विशेष बाब म्हणजे, पावसाळ्यात या झुडुपाखाली बसल्यास पाण्याचा एकही थेंब लागत नाही. त्यामुळे गुराख्यांचे पावसाळ्यात निवाऱ्याचे व हक्काचे ठिकाण असून, पाण्यापासून बचाव करण्यासाठी कुरपुडच्या आश्रयाखाली गुराखी जातात.