The most abuse of power by the rulers! : Sharad Pawar | सत्ताधाऱ्यांनी केला सत्तेचा सर्वाधिक दुरुपयोग ! :शरद पवार

हीच वेळ आहे, मैदान मारण्याची! असा ज्येष्ठत्वाचा सल्ला राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांनी नाशिक पश्चिममधील उमेदवार डॉ. अपूर्व हिरे यांना दिला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला.

ठळक मुद्देमखमलाबाद, सिडको येथे जाहीरसभा

नाशिक : कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.
सिडकोतील पवननगरला नाशिक पश्चिमचे राष्टÑवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, उमेदवार डॉ. अपूर्व हिरे, देवीदास पिंगळे, नाना महाले, जयवंत जाधव, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, लक्ष्मण जायभावे, अर्जुन टिळे, डॉ. शोभा बच्छाव, करण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोलताना पवार यांनी यावेळी १९८५ सालासारखी परिस्थिती दिसत असून, यावेळीदेखील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्य आणि केंद्र सरकारने सामान्य जनतेची कोणतीच कामे केली नाहीत. त्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात असल्याचे पवार यांनी नमूद केले.
गत ५ वर्षांत १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली. ज्या शेतकºयांची २-४ लाखांची कर्ज थकतात, त्यांना नोटिसा पाठवून बेअबु्र करता आणि कोट्यवधींची उद्योजकांची कर्जे, राष्टÑीयीकृत बॅँकांची देणी माफ करून टाकता हा सामान्यांवर मोठा अन्याय आहे. तो बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याआधी भुजबळ यांनीदेखील राज्याच्या कारभारावर घणाघाती हल्ला चढवला. तसेच या सरकारने केवळ खोटी आश्वासने देण्याचे काम केले असल्याचा आरोप केला. तर अपूर्व हिरे यांनी एचएएल, स्थानिक बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
दत्तक बापापेक्षा गरीब बाप बरा...
मखलाबाद येथे झालेल्या सभेत देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शहर दत्तक घेऊन कोणतेही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काम केले नाही. नाशिकमधील उद्योगधंदे बंद पडले असून, उद्योजक, कामगार, शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले असताना यासंबंधी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की ते देशभक्तीच्या घोषणा देऊन मुद्द्यांवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा परक्या दत्तक बापापेक्षा आपला गरीब बापच बरा, अशी टीका पवार यांनी केली. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. आमचा रेवड्यांची कुस्ती खेळणारा पोरगंही त्यांना सरस ठरेल, असं असताना मुख्यमंत्री म्हणतात त्यांना समोर कोणी पहिलवानच दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली. आपण काहीच केले नाही अशी टीका सध्या केली जाते मग पन्नास-पंचावन्न वर्षात काही तरी काम केले असल्यानेच सरकारने आपल्याला पद्म पुरस्कार दिला असेल ना असेही ते म्हणाले.
हिरे घराण्याकडे सेवेचा वारसा
भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे असा समाजसेवेचा मोठा वारसा हिरे घराण्याकडे आहे. स्वत: अपूर्व यांनीदेखील विधीमंडळात नाशिक जिल्ह्याचे अनेक प्रश्न मांडण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे यावेळी सेवेचा वारसा असलेला उमेदवार निवडण्याची संधी तुम्हाला असल्याचे सांगून पवार यांनी अपूर्व यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

गोदाकाठी गाजरविक्री
छगन भुजबळ यांनी यावेळी नेहमीच्या शैलीत सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गोदाकाठी भाजीबाजार मैदानावर होत असल्याचा संदर्भ घेऊन भुजबळ यांनी नाशिकचा बाजार नेहमी बुधवारी भरतो, मात्र आज चक्क गुरुवार असताना देखील गोदाघाटावर बाजार भरला आहे. या बाजारात गाजर विक्री सुरू आहे, असे सांगून फडणवीस यांच्या सभेची खिल्ली उडवली.

Web Title: The most abuse of power by the rulers! : Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.