रुग्णालयांची तपासणी मोहीम आणखी महिनाभर
By Admin | Updated: April 26, 2017 01:59 IST2017-04-26T01:59:33+5:302017-04-26T01:59:48+5:30
महापालिका : ५१२ रुग्णालयांची तपासणी

रुग्णालयांची तपासणी मोहीम आणखी महिनाभर
नाशिक : महापालिकेने राज्य शासनाच्या आदेशानुसार महिनाभरापूर्वी शहरातील रुग्णालये, दवाखाने, गर्भपात व सोनोग्राफी केंद्र यांची सुरू केलेली तपासणी मोहीम दि. १५ मे पर्यंत सुरू राहणार असून, आतापर्यंत ५१२ रुग्णालये व १४३६ क्लिनिक्स यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. दरम्यान, संपूर्ण तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करून त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेमार्फत सदर मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने ३० पथके तयार केली असून, प्रत्येक पथकात एक स्त्री व एक पुरुष वैद्यकीय अधिकारी, दोन कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. प्रत्येक पथकाला कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आले आहे. तपासणी मोहिमेत रुग्णालये, प्रसूतिगृहे, क्लिनिक, दवाखाने यांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकूण ५६६ रुग्णालये आहेत.
त्यात १८२ मॅटर्निटी होम आणि ३८४ नर्सिंग होम आहेत. तपासणीप्रसंगी संबंधित रुग्णालय नोंदणीकृत आहे किंवा नाही, सोनोग्राफी सेंटर कायद्यानुसार सुरू आहे काय, मॅटर्निटी होम हे बॉम्बे मॅटर्निटी होम कायद्यानुसार चालविले जात आहे काय, मॅटर्निटी होममध्ये शस्त्रक्रिया करण्याची परवानगी घेतली आहे काय तसेच रुग्णालये, दवाखाने यांच्याबाहेर लावण्यात आलेले फलक यांची माहिती संकलित केली जात आहे. यामध्ये शहरातील सर्व अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी दवाखान्यांचाही समावेश असणार आहे.
मागील महिन्यात दि. १७ मार्चपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. ती १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार होती. परंतु सदर तपासणी मोहिमेला आणखी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आतापर्यंत शहरातील ५६६ पैकी ५१२ रुग्णालये, १४३६ क्लिनिक्स, १२४ पैकी १०७ गर्भपात केंद्रे आणि २३० पैकी १७० सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यात आढळून येणाऱ्या त्रुटी जिल्हा समितीपुढे ठेवण्यात येतील. समिती त्यानुसार कारवाई करण्यासंबंधी आदेश देईल, असेही डॉ. डेकाटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बंद दवाखान्यांची तपासणीमोहिमेत शहरातील सर्व रुग्णालये, दवाखाने, क्लिनिक यांची काटेकोर तपासणी केली जाणार असून, गरज भासल्यास पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे डॉ. डेकाटे यांनी सांगितले. महिनाभरात काही रुग्णालये, दवाखाने वारंवार भेटी देऊन बंद आढळून आले. त्यांचीही तपासणी केली जाणार असून, तसा अहवालही समितीपुढे मांडण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.