संततधार पावसाने सोमवार पाण्यात
By Admin | Updated: July 28, 2015 01:02 IST2015-07-28T01:02:13+5:302015-07-28T01:02:50+5:30
संततधार पावसाने सोमवार पाण्यात

संततधार पावसाने सोमवार पाण्यात
नाशिक : रविवारी दुपारनंतर शहरात अधून-मधून हजेरी लावणाऱ्या पावसाने सोमवारीही सकाळपासून मुक्काम कायम ठेवत नोकरदारांनी सार्वजनिक सुट्टी घरातच घालविली. परिणामी त्याचा जनजीवनावर चांगलाच परिणाम दिसून आला. मात्र जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे रस्त्यांची ‘वाट’लागली.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी दुपारनंतर हजेरी लावली. जोराचा कोसळत नसला तरी, अधून-मधून येणाऱ्या सरींनी काहीसे जनजीवन बाधित झाले, त्यामुळे रविवारची सार्वजनिक सुटी नागरिकांना छत्री, रेनकोट बरोबर घेऊनच घालवावी लागली. मात्र रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाने जोर धरला. पहाटेपर्यंत धो-धो कोसळून काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळी दहा वाजेपासून पुन्हा एकवार हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नोकरी, धंद्यानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांना पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणांचा आश्रय घ्यावा लागला. सोमवारी राज्य सरकारची शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना सार्वजनिक सुटी असल्याने त्यांची सुटी पाण्यात गेली. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे रस्ता वाहतुकीवरही परिणाम झाला. एरव्ही वाहनांच्या वर्दळीने गजबजणारे रस्ते काही प्रमाणात शुकशुकाट होते, तर साधुग्राममध्येही भाविकांची संख्या रोडावली होती. पावसामुळे आषाढी एकादशीनिमित्त देव-दर्शनाला जाऊ पाहणाऱ्या भाविकांनाही मुरड घालावी लागली. सायंकाळीही पावसाने हजेरी कायम ठेवल्यामुळे त्याचा व्यवसाय व व्यापारावरही परिणाम झाला.
दोन दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळल्याने रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असून, काही रस्त्यांची चाळणही झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागली. येत्या चोवीस तासात पावसाची हजेरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.