सोमवारीही कुशावर्तावर स्रान
By Admin | Updated: September 14, 2015 22:09 IST2015-09-14T22:08:39+5:302015-09-14T22:09:13+5:30
त्र्यंबकेश्वर : देशभरातून आलेल्या भाविकांची अलोट गर्दी

सोमवारीही कुशावर्तावर स्रान
त्र्यंबकेश्वर : पूर्वी श्रावण महिन्यात जास्त गर्दी झाली तर सिंहस्थ पर्वणीची अनुभूती आली असे संबोधले जायचे, आता मात्र यंदा सिंहस्थाच्या दुसऱ्या शाहीस्रानाला येथे भरणाऱ्या संत निवृत्तिनाथ यात्रेएवढी जेमतेम गर्दी होती. रविवारी साधारणत: पाच लाख भाविकांनी दुसऱ्या मुख्य पर्वणीचा लाभ घेतला. परंतु शाहीस्रानाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी येथे भाविकांनी अलोट गर्दी करून कुशावर्तावर स्रान केले.
महाराष्ट्र शासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २८०० कोटी, तर केंद्र शासनाने ५०० कोटी असे एकूण ३३०० कोटी रुपये खर्च केले. सिंहस्थासाठी त्र्यंबक नगरपालिकेला जवळपास ६० कोटींच्या आसपास निधी आला होता. अर्थात यातील बहुतेक निधी (कामांसाठीचा) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय खर्च होऊ शकला नाही. याव्यतिरिक्त प्रत्येक यंत्रणेसाठी मिळालेला निधी पाहता त्र्यंबकेश्वर व सर्व यंत्रणेमार्फत काही निधी खर्च झाला. नाशिकला भरपूर निधी मिळाला. तथापि झालेली गर्दी पाहता व येणारी एक सिंहस्थ पर्वणी मिळून झालेली गर्दी केवळ १० ते १२ लक्ष होईल. कदाचित त्यापेक्षा आकडा कमी होईल, मात्र सिंहस्थाचा प्रचार, प्रसार होण्यास महाराष्ट्र शासन कमी पडले. उलट त्र्यंबकेश्वर-नाशिकला होणारी गर्दी आणि त्यामुळे दोन्हीही ठिकाणे अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर आहे, असा प्रचार केल्याने देशभरातून भाविकांचा ओघ कमी झाला. तरीही आलेले भाविक उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, राजस्थान, बंगाल, कर्नाटक राज्यातून आले होते.
बंदोबस्त काहीसा शिथिल केला असला तरीही थोडीफार आगळीक काही अधिकारी आणि पोलिसांकडून झालीच. अनेकांना गचांड्या मारल्या तर काहीजण रांगेत असूनही त्यांना कुशावर्तावर जाताना झालेल्या गर्दीमुळे रांगेतून काढून देण्यात आले. हमारे भक्तों को कातारसे बाहर निकाला न जाय या साधूंच्या मागण्या पूर्ण करण्यास प्रशासनाने धन्यता मानली.
तथापि, रांगेमधील भाविकांशी असे वागले असते तर पोलिसांना त्यांच्याकडूनही दुवा मिळाला असता. अनेक महिला रडत होत्या तर अनेकांना आपल्या नातेवाइकांना भेटू दिले नाही. त्र्यंबकला साधे वर्तमानपत्रांचे पार्सलदेखील आले नाही. मागच्या पर्वणीलादेखील वर्तमानपत्रांचे पार्सल असणारे वाहन शहरात येऊ दिले नाही अन्य सुविधा (भाजीपाला वगैरे) व्यवस्थित दिल्या. अनेक ठिकाणी अन्य कर्मचाऱ्यांकडून अरेरावी केली गेली, लोकांनी पादत्राणे काढली की, ती पादत्राणे त्वरित कचरा गाडीत टाकून बाजूला गोळा केली जायची. अनेक भाविकांनी चपला शोधण्याकडे दुर्लक्ष केले. कोणाला वेळच मिळाला नाही. एस.टी. बसगाड्यांची संख्या, खासगी वाहने, आखाड्यातील भक्त अशी संख्या चार लाखांच्या वर
पोहोचली. एकंदरीत भाविक असे कमीच आले. डोक्यावर दहशतवादी हल्ल्याची अनामिक भीती घेऊन ! (वार्ताहर)