आई मला शाळेत जायचं नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:59+5:302021-02-05T05:44:59+5:30
नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही ...

आई मला शाळेत जायचं नाय
नाशिक : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या असून आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळाही सुरू होणार आहेत. परंतु, जवळपास दहा महिन्यांपासून शाळेपासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी विविध कारणांमुळे नकारघंटा सुरू असून सातवी, आठवीतील काही विद्यार्थी वगळता पाचवी सहावीचे विद्यार्थी मात्र ‘आई मला शाळेत जायचे नाही’ असा हट्ट करीत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा आलेख घसरल्याने ४ जानेवारीपासून जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेत येणारे विद्यार्थीही सुरक्षित आहेत. त्यामुळे आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने सर्व तयारीही केली आहे. मात्र, कोरोनाच्या सुुरुवातीच्या काळात मुलांनी घराबाहेर पडू नये, यासाठी आईवडिलांनींच मुलांना सांगितलेली बाहेर कोरोना आहेसारखी वाक्ये आता मुलांच्या तोंडी असून जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असतानाही कोरोनाचे कारण देत विद्यार्थी शाळेत जाण्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पॉइंटर-
पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या
पाचवी - १,२२, ७४३
सहावी - १,२०,६४५
सातवी - १,१८,३३२
आठवी -१,१५,९१०
बाहेर कोरोना आहे, विद्यार्थी देताहेत कारण
- पाचवी-सहावीतील विद्यार्थ्यांची बाहेर कोरोना असल्याचे कारण देत शाळेसाठी नकार घंटा सुरू आहे.
- काही विद्यार्थी शाळेसाठी उत्सुक आहेत, परंतु, आईवडिलांना शाळेत सोडण्यासाठी हट्ट करीत शाळेला जाण्यास नकार देत आहेत.
- शाळा सुरू झाल्या तरी अनेक स्कूलबस अद्याप सुरू नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थी स्कूलबस नसल्याचे सांगत आहेत.
- नववी-दहावीच्या अद्याप पूर्ण तासिका होत नाहीत, त्यामुळे ऑनलाइनच बरे असे सांगत काही विद्यार्थी टाळाटाळ करीत आहेत.
- आठवीच्या अनेक विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची इच्छा आहे. परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील गर्दीमुळे ते शाळेचा कंटाळा करीत आहेत.
वर्ग सुरू करण्याची तयारी
शिक्षण विभागाने शहर व ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत १ हजार ७८ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, ग्रामीण भागातील ७ हजार ४३६ शिक्षकांची चाचणी होणार आहे. शहरातील मनपा व खासगी व्यवस्थापनाच्या एकूण ४०५ शाळांमध्ये ग्रामीण भागातील १ हजार ९२३ शाळांमधील पाचवी चे आठवीचे वर्ग सुरू होणार आहेत.
कोट-१
बाहेर कोरोना असल्याचे आईबाबांनीच सांगितले आहे. त्यांनी बाहेर खेळायलाही जाऊ दिले नाही. आता अजून स्कूलबसही सुरू झाली नाही. मग शाळेत कसे जायचे?
- संदेश जाधव, पाचवीतील विद्यार्थी
कोट-२
नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी अजून काही विद्यार्थी शाळेत येत नाहीत. तर पाचवी ते आठवीचे वर्ग कशासाठी सुरू केले जात आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षा महत्त्वाच्या असल्याने हेच वर्ग सुरू करायला हवे होते.
- भूषण पाटील, सहावीतील विद्यार्थी
कोट-३
आता शाळा सुरू होत असल्याने किमान तीन महिने तरी अभ्यास चांगला होईल. त्याचा पुढच्या वर्षातही फायदा होईल. शाळेत शिक्षकांनी शिकविलेले ऑनलाइनपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकेल.
- तेजस अहिरे, सातवीतील विद्यार्थी
कोट-४
नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे आता आठवीचे वर्ग सुरू करण्यास हरकत नाही. तसेच स्कूलबसही सुरू होणे आवश्यक आहे. मागील उणीव भरून काढण्यासाठी प्रत्यक्ष वर्गांसोबत ऑनलाइन अभ्यासक्रही सुरूच राहायला हवा
- गौरव टिळे, आठवीतील विद्यार्थी