पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आठवडाभरात दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 16:45 IST2019-06-01T16:34:56+5:302019-06-01T16:45:26+5:30
गेल्या बुधवारी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका पित्याने अशाच पद्धतीने रात्री घरात सगळे झोपलेले असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.

पित्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आठवडाभरात दुसरी घटना
नाशिक : ज्या पित्याने जन्माला घातले त्याचीच आपल्या लहानग्या बालिकेवर वक्रदृष्टी व्हावी आणि त्याने पोटच्या मुलीची अब्रू धोक्यात आणावी, अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना या आठवड्यात घडल्या आहेत. पेठरोडवरील फुलेनगर भागात एका ४५ वर्षीय पित्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या बुधवारी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत एका पित्याने अशाच पद्धतीने रात्री घरात सगळे झोपलेले असताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती. या घटनेत म्हसरूळ पोलिसांनी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून ‘त्या’ बापाला अटक केली आहे. ही घटना ताजी असताना पुन्हा पंचवटी भागात पेठरोडवर अशीच दुसरी घटना घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फुलेनगर परिसरात गेल्या गुरु वारी रात्री फिर्यादी पीडित मुलगी ही आपले आई-वडील तसेच भावासह घरात झोपलेली असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित पित्याने मुलीच्या शरीराशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत याबाबत ‘आईला सांगू नको, अन्यथा जिवे ठार मारील’, अशी धमकीही दिली. दुस-या दिवशी सकाळी पीडित मुलीने रात्री घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर पीडितेला सोबत घेऊन नातेवाइकांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्यात घडलेला सगळा प्रकार सांगत संशयित पित्याविरुद्ध फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी घटनेनंतर फरार झालेल्या संशयित बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.