चंदनचोरांच्या टोळीवर ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:54 IST2019-10-15T23:10:28+5:302019-10-16T00:54:53+5:30
संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी या चौघा चंदनचोरांची गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून चंदनचोरीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात ‘मोक्का’नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

चंदनचोरांच्या टोळीवर ‘मोक्का’
नाशिक : संघटित टोळी तयार करून शहरातील सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून सैन्य व पोलीस दलाच्या आस्थापनांमध्ये रात्रीच्या सुमारास घुसखोरी करून चंदनवृक्ष कापण्याचा सपाटा लावणाºया शेणीत, पाथर्डी गावातील चौघांना पोलिसांनी सातपूरच्या गुन्ह्यात यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी या चौघा चंदनचोरांची गुन्हेगारी प्रवृत्ती तपासून चंदनचोरीच्या दरोड्याच्या गुन्ह्यात ‘मोक्का’नुसार कारवाई करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे शहरातील संवेदनशील सैन्य दलाच्या आस्थापनांसह शासकीय निवासस्थानांमधील घुसखोरीला चाप लागण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे.
सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक वसाहतीमध्ये सहा चंदनचोरांच्या टोळीने एका कारखान्यातील सुरक्षारक्षकाला जिवे ठार मारण्याचा धाक दाखवून मारहाण करत गंभीर जखमी केले होते. तसेच त्याच्यासमोर कारखान्यातील चंदनवृक्ष कापून लंपास केल्याची धक्कादायक घटना ५ आॅगस्ट २०१९ साली घडली होती. या गुन्ह्यात तपासी पथकांनी आपल्या कौशल्याचा वापर करत या गुन्ह्यात टोळीचा म्होरक्या लक्ष्मण तात्या पवार (२२), संजय माणिक जाधव (२५ दोघे रा.पाथर्डीगाव), शिवाजी उत्तम जाधव (२५), उत्तम नारायण जाधव (५५, दोघे रा. नानेगावरोड, पळसे) यांना अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार रामा विलास कोळी (४०, रा. पाथर्डी), तात्या तुकाराम पवार (५० शेणीतगाव) हे दोघे अद्याप फरार असून, पोलीस त्यांच्या मागावर आहेत. चौघा चोरट्यांकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, चंदनवृक्षाचा बुंधा जप्त केला आहे. चोरी केलेल्या चंदनाच्या वृक्षांच्या खोडामधील गाभा काढून ही टोळी चढ्या भावाने विक्री करत असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
...म्हणून ‘मोक्का’चा दणका
नियोजनबद्ध कट रचून संघटितपणे वारंवार ही टोळी गुन्हे घडवून आणत होती. संशयितांविरुद्ध यापूर्वीही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी शस्त्रांचा वापर करून केलेले गुन्हे की ज्यामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. त्यापैकी काही गुन्हे न्यायप्रविष्ट असल्याचे पूर्वइतिहासावरून पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नांगरे-पाटील यांनी गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून शहरात सक्रिय असलेली चंदनचोरांची टोळी फोडून काढण्यासाठी मोक्का कायद्यानुसार कारवाईचे आदेश दिले आहे.
येथील कापले चंदनवृक्ष
देवळाली कॅम्प, उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील सैन्य दलाच्या विविध अस्थापनांसह गंगापूर, मुंबईनाका या भागातील शासकीय निवासस्थाने आस्थापना आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील चंदनवृक्ष या टोळीने कापल्याचे तपासात पुढे आले आहे.