बोलठाण येथे एटीएममध्ये मोकाट जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 12:31 IST2019-08-01T12:30:37+5:302019-08-01T12:31:12+5:30
नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथे बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळील एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत असुन पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात.

बोलठाण येथे एटीएममध्ये मोकाट जनावरे
नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथे बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळील एटीएम मशीनची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत असुन पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात. या एटीएम मशीनसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला होता, परंतु त्याचे मासिक वेतन थकल्यामुळे त्याने दिड वर्षापासून काम सोडून निघून गेला असल्याचे समजते. तेव्हापासून जेऊर रस्त्यालगत असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या जुन्या इमारती जवळ असलेल्या एटीएम मशीनला सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे उन्हाळ्यात उन्हापासून रक्षण करण्यासाठी आणि पावसाळ्यात पावसापासून रक्षण करण्यासाठी एटीएम मशीन असलेल्या ठिकाणी चक्क गावातील मोकाट जनावरे बसलेली असतात. त्यामुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना अगोदर या मोकाट जनावरांना बाहेर काढण्याचे काम करावे लागते. त्यानंतर पैसे काढता येतात. सध्या एटीएम मशीन असलेल्या ठिकाणपासुन अगदी पंधरा फूट अंतरावर येथे बँकेची शाखा सुरू झाली. परंतु सन २०१६ मध्ये नोव्हेंबर महिन्यात नोटबंदी झाली तेव्हा बँक नवीन जागेत अर्धा किमी अंतरावर स्थलांतरीत झाली. तेव्हापासून एटीएम मशीन दुर्लक्षित झाले. सध्या एटीएम मोकाट जनावरांचा अड्डा बनला आहे.