आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 17:32 IST2018-08-16T17:26:17+5:302018-08-16T17:32:07+5:30
संशयित पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आमदाराचा ‘लोगो’ मोटारीवर; १८ लाख ६० हजारांना घातला गंडा
नाशिक : मुंबई येथील एका अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीच्या नावाखाली देवळा तालुक्यातील एका शेतक-याला सुमारे पाच कोटी २३ लाख रुपयांचा बनावट धनादेश देत विश्वास संपादन करुन प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली १८ लाख ६० हजाराची रोकड घेऊन फसवणूक करणा-या दोघा भामट्यांच्या मुसक्या गंगापूर पोलिसांनी आवळल्या. त्यांच्याकडून रोकडसह बनावट धनादेश, मोबाईल, टाटा सफारी मोटार असा एकूण २५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गंगापूर पोलीस ठाण्यात मागील गुरूवारी (दि.९) देवळा तालुक्यातील लोहणेर येथील शेतकरी धनंजय एकनाथ महाजन (४१) यांना संशयित राकेश बापू पानपाटील (३३, रा.जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (२३, रा.ना.रोड) यांनी मुंबईच्या बालाजी फायनान्समार्फत क र्ज प्रकरण मंजूरीचे आमीष दाखवून सुमारे १८ लाख ६० हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महाजन यांनी संशयितांविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपासचक्रे फिरविली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरिक्षक समीर वाघ यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वाघ यांच्या पथकाने सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये सापळा रचला. औद्योगिक वसाहतीमध्ये दोघे संशयित आले असता पोलिसांनी त्यांच्या मुसक्या बांधल्या. दोघांची कसून चौकशी केली असता पानपाटील, सोनवणे यांनी गुन्ह्याची कबुली देत गुन्ह्यामधील १८ लाख ६० हजाराची रोकड, टाटा सफारी मोटार (एम.एच१५ ईबी ०१४४), अॅपलचा आयफोन, बनावट धनादेश असा एकूण २५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
‘विधानसभा सदस्य’स्टिकर चा वापर
फसवणूकीच्या गुन्ह्यात संशयितांनी वापरलेल्या टाटा सफारी मोटारीवर ‘आमदार- विधानसभा सदस्य’ असे स्टिकर लावण्यात आले होते. एकूणच चोरट्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या मोटारीवर कोणाला संशय येऊ नये, तसेच पोलिसांच्या नाकाबंदीमधून सहजरित्या निसटता यावे, या उद्देशाने चक्क आमदाराचे स्टिकर लावल्याचे उघडकीस आले आहे. एकूणच शासकिय, राजकिय महत्त्वांच्या व्यक्तींच्या नावांचा व पदांचा गैरवापर होण्याच्या घटना वाढल्या आहेत. उच्चपदांच्या नावांचे स्टिकर असलेल्या वाहनांवर पोलिसांची करडी नजर यापुढे राहणार आहे.