नाशिकच्या मिरजकर सराफ, त्रिशा जेम्सकडून गुंतवणूकदारांची सव्वा कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 18:33 IST2018-07-20T17:36:13+5:302018-07-20T18:33:46+5:30
नाशिक : रोख गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचे आमीष दाखवून जुने नाशिक च्या बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी शेकडो गुंतवणूकदारांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संचालकांसह अकरा संशयितांविरोधात फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे़

नाशिकच्या मिरजकर सराफ, त्रिशा जेम्सकडून गुंतवणूकदारांची सव्वा कोटींची फसवणूक
नाशिक : रोख गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचे आमीष दाखवून जुने नाशिक च्या बुधवार पेठेतील मिरजकर सराफ व गंगापूर रोडवरील त्रिशा जेम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी शेकडो गुंतवणूकदारांची एक कोटी २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संचालकांसह अकरा संशयितांविरोधात फसवणूक तसेच महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे़
पल्लवी हर्षल केंगे (वय ३०, रा. शिंगाडा तलाव, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सराफ बाजारातील मिरजकर सराफ,जेम्स प्रायव्हेट लिमिटेड व गंगापूररोडवरील त्रिशा जेम्स प्रायव्हेट लिमिटेड या सोने विक्रीच्या दोन फर्म स्थापन केल्या़ तसेच आपल्या ओळखीतील ग्राहकांना व सदस्यांना आमच्या फर्ममध्ये रोख गुंतवूणक वा सोने तारण ठेवल्यास त्यावर दरमहा एक टक्का व्याजाचे आमिष दाखविले़ त्यामुळे १३ एप्रिल २०१५ ते १ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत शेकडो ग्राहकांनी या दोन्ही फर्ममध्ये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असे १ कोटी २२ लाख रुपये ठेवले़ मात्र संशयितांनी ठरल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना व्याज दिले नाही तसेच घेतलेल्या ठेवी देखील परत न करता फसवणूक केली़
सरकारवाडा पोलिसांनी मिरजकर सराफ व त्रिशा जेम्स या दोन्ही फर्मचे संचालक मिरजकर यांच्याबरोबरच हर्षल नाईक, अनिल चौघुले, महेश, शिरीष आढाव, परीक्षित औरंगाबादकर,सुरेश भास्कर, भारत सोनवणे, रूबल नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्त कुलकर्णी व कीर्ती नाईक या अकरा संशयितांविरोधात फसवणूक तसेच एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शेळके हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत़