मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:18 IST2025-09-18T13:14:42+5:302025-09-18T13:18:55+5:30
मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे

मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
Manikrao Kokate vs Rohit Pawar: राज्याचे माजी कृषीमंत्री आणि सध्याचे माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चेत आहेत. सुरुवातीला त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वरिष्ठ नेत्यांनी त्यांना समज दिली होती. त्यानंतर विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्याकडून कृषीखाते काढून घेण्यात आलं. मात्र आपण मोबाईल रमी खेळत नव्हतो तर ती जाहिरात होती असा दावा माणिकराव कोकाटे यांनी केला होता. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने त्यांना मंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर आता मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या व्हिडीओवरुन कोर्टात धाव घेतली आहे.
सुमारे दीड महिन्यापूर्वी तत्कालीन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी विधिमंडळात मोबाइलवर खेळत असल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यावर अॅड. कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. बुधवारी नाशिकच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत कोकाटे यांच्या वकिलांनी ते रमी होते कशावरून? तसेच व्हायरल व्हिडीओ मॉर्फ केला नसेल कशावरून, असा प्रश्न रोहित पवार यांना केला आहे.
कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी खेळतात म्हणून आमदार रोहित पवार यांनी टीका तर केली होती. तसेच जागोजागी आंदोलने करण्यात आल्याने अखेरीस कोकाटे यांच्याकडील कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले आणि त्यांना क्रीडा खाते देण्यात आले. त्याच वेळी अॅड. कोकाटे यांनी आपण संबंधितांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले होते.
कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयात बदनामीचा फौजदारी दावा आपले वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत केला आहे. त्यावर बुधवारी पहिली सुनावणी झाली. यावेळी वकिलांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील व्हिडीओ मॉर्फ केला गेला नसेल कशावरून, तसेच तो खेळ रमीचाच होता हे कशावरून आणि ते रमीच खेळत होते कशावरून, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित केले.