नाशिकमध्ये वडाळागावातील घरावर मध्यरात्री पोलिसांची धाड; जप्त केला ८५००किलो गांजाचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2023 14:28 IST2023-04-30T14:28:01+5:302023-04-30T14:28:09+5:30
वडाळागाव परिसरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थविक्रीचा अवैध व्यवसाय तेजीत आला आहे.

नाशिकमध्ये वडाळागावातील घरावर मध्यरात्री पोलिसांची धाड; जप्त केला ८५००किलो गांजाचा साठा
- संजय शहाणे
नाशिक : पोलिस ठाणे हद्दीतील वडाळागाव परिसरातील महेबुबनगर, सादिकनगर, म्हाडा वसाहत परिसर अमली पदार्थविक्रीचा अड्डा बनत चालला आहे. याबाबत गोपनीय माहिती मिळाली असता पोलिसांनी रविवारी (दि.३०) मध्यरात्रीच्या सुमारास महेबुबनगर भागात एका घरात छापा टाकला. यावेळी घरातून एक लाख रूपये किंमतीचा सुमारे ८ हजार ५०० किलो इतका गांजाचा साठा आढळून आला.
वडाळागाव परिसरात मागील काही महिन्यांपासून अमली पदार्थविक्रीचा अवैध व्यवसाय तेजीत आला आहे. वडाळागावातील लोकांनी दोन महिन्यांपुर्वी अमली पदार्थविरोधी जनजागृती फेरीदेखील काढली होती. यानंतर काही दिवस व्यवसाय मंदावला; मात्र पुन्हा या अवैध व्यवसायाने तेजी धरली आहे. यामुळे तरुण पिढीचे आयुष्य उद्धवस्त होत असून ठोस कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबतच्या तक्रारी इंदिरानगरचे वरिष्ठ पाेलिस निरिक्षक गणेश न्याहदे यांनाही प्राप्त झाल्या. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ‘कोम्बिंग ऑपरेशन’दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.
यावेळी म्हाडा इमारतींच्या पाठीमागे महेबुबनगर भागात अमली पदार्थ विक्री एका महिलेकडून केली जात असल्याचे समजले. यावेळी संशयास्पद घराजवळ पोलिस निरिक्षक गणेश न्यायदे , उपनिरीक्षक सुवासिनी बारेला, लक्ष्मण बोराडे, सागर परदेशी, योगेश जाधव, युवराज पाटील, अमजद पटेल, वसंत ढगे यांच्या पथकाने धडक दिली. यावेळी पंचासमक्ष पावणेतीन वाजता पथकाने छापा टाकला. यावेळी संशयित इम्तियाज उमर शेख (३०,रा. मेहबूबनगर) याने कारवाईत हस्तक्षेप करत बंद घराचा दरवाजा उघडण्यास नकार दिला. यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेत सरकारी वाहनात डांबले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोखंडी सळीने तोडले कुलूप!
संशयित इम्तियाज शेख याने बंद घराच्या कुलुपाची किल्ली दिली नाही. तसेच पोलिसांच्या कारवाईला सहकार्य केले नाही. यावेळी पथकाकडे खात्रीलायक माहिती असल्यामुळे लोखंडी सळीचा वापर करत पोलिसांनी कुलुप तोडले. घरात प्रवेश करून झाडाझडती घेतली असता एका कापडी पिशवीत गांजाचा साठा दडवून ठेवलेला आढळून आला. यावेळी सुमारे ८ हजार ५४६किलो इतका हा साठा असल्याचे पोलिसांनी सांगितले.