म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी विविध समस्यांच्या गर्तेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:24 IST2019-05-27T00:23:50+5:302019-05-27T00:24:11+5:30
दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

म्हसरूळ शिवारातील म्हसोबावाडी विविध समस्यांच्या गर्तेत
पंचवटी : दिंडोरीरोडवरील म्हसरूळ शिवारात म्हसोबावाडीतील रहिवाशांना मनपा प्रशासनाने घरपट्टी लागू केली असली तरी आजही पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप, साफसफाई यांसारख्या विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वर्षानुवर्षे महापालिका प्रशासनाकडे सुखसुविधा पुरविण्याची मागणी करूनदेखील प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी करत अजून किती दिवस म्हसोबावाडी भागात राहणाऱ्या नागरिकांना सुख-सुविधेसाठी प्रतीक्षा करावी लागेल, असा सवाल करून प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाने घंटागाडी योजना सुरू केली. त्यानंतर सुरुवातीच्या काही दिवस म्हसोबावाडी परिसरात घंटागाडी फिरकली. मात्र त्यानंतर अद्याप घंटागाडी आली नसल्याचे सांगत नागरिकांना कचरा उघड्यावरच फेकावा लागतो. सुमारे आठशे ते हजार लोकवस्ती या भागात असली तरी मनपा स्वच्छता विभागाचे कर्मचारी येत नाही. औषध फवारणी होत नाही, साफसफाईदेखील केली जात नाही. लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही तसेच अंगणवाडी नाही, परिसरात मोकाट डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या भागात नागरी वसाहत थाटलेली असली तरी प्रशासनाकडून कोणत्याही सुख-सुविधा पुरविला जात नसल्याने म्हसोबावाडीतील नागरिकांना आजही पथदीप, रस्ते, पिण्याचे पाणी आदी सुविधा मिळविण्यासाठी अजून किती दिवस वाट बघावी लागणार आहे, असा सवाल उपस्थित केला.
महिलांची पाण्यासाठी हातपंपावर झुंबड
म्हसोबावाडीत जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता नसल्याने नागरिकांना आजही खडतर मार्गानेच ये-जा करावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना रस्त्याची प्रतीक्षा आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट आहे. परिसरात महिलांना हातपंपावर पाणी भरावे लागते. पाणी भरण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडत असल्याने अनेकदा पिण्याच्या पाण्यावरून महिलांमध्ये वादविवाद होत असतात. परिसरात राहणाºया नागरिकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिलांची कुचंबणा होते.