शहराचा पारा चढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:15 IST2020-11-16T00:14:37+5:302020-11-16T00:15:45+5:30
शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे.

शहराचा पारा चढला
नाशिक : शहराचा पारा चार दिवसांपूर्वी थेट १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचा कडाका नाशिककरांना जाणवू लागला होता; मात्र अचानकपणे पुन्हा तापमानाचा पारा वेगाने चढल्याने वातावरणातून थंडी गायब झाली असून, नागरिकांना उष्मा अनुभवयास येत आहे. रविवारी (दि.१५) शहराचे किमान तापमान १७.१ अंश, तर कमाल तापमान ३१.५ अंशांपर्यंत नोंदविले गेले.
दिवाळीत थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली होती; मात्र वसुबारसनंतर शहराच्या किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढू लागल्याने वातावरणातील गारवा कमी झाला. गुरुवारी सकाळी थंडीचा जोरदार कडाका नाशिककरांनी अनुभवला. पारा थेट १०.४ अंशांपर्यंत खाली सरकला होता. त्याचप्रमाणे कमाल तापमानदेखील घसरू लागले होते. बुधवारी कमाल तापमान थेट २७.८ अंशांपर्यंत खाली आले होते. मात्र वसुबारस होताच पुन्हा शहराच्या किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने वातावरणातून थंडी गायब झाल्याचा अनुभव नागरिकांना सध्या येत आहे. नागरिकांनी थंडीची सुरुवात झाली म्हणून उबदार कपडे वापरण्यास काढले; मात्र दोन ते तीन दिवसांतच पुन्हा लहरी निसर्गाने आपले रूप बदलल्याने वातावरणातही दमटपणा वाढला. परिणामी उबदार कपड्यांचा वापर थांबला.सध्यातरी वातावरणात उष्मा जाणवत असला तरीदेखील थंडीचे पुन्हा पुढील आठवड्यात जोरदार आगमन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोव्हेंबरअखेरीस नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागू शकतो, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.