नाशिक : वि. वा . शिरवाडकर तथा तात्यासाहेबांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अजोड कलाकृती म्हणजे ‘नटसम्राट’... गेल्या अनेक वर्षांपासून नाट्यरसिकांच्या हृदयात अढळ स्थान करणाऱ्या या नाटकावर आधारित लवकरच मराठी चित्रपट साकारणार असून, या चित्रपटाचा मुहूर्त कुसुमाग्रजांच्या भूमीतूनच होणार आहे. तात्यासाहेबांच्या जयंतीदिनी म्हणजे येत्या २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज स्मारकात हा योग जुळून येणार आहे. तात्यासाहेबांच्या या प्रख्यात नाटकाचा पहिला प्रयोग सन १९७० मध्ये मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात झाला होता. अप्पासाहेब बेलवलकर या नटसम्राटाची कथा व व्यथा या नाटकात तात्यासाहेबांनी मांडली होती. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक वर्षे अप्पासाहेब बेलवलकर ही मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर सतीश दुभाषी, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, दत्ता भट, मधुसूदन कोल्हटकर, राजा गोसावी, गिरीश देशपांडे, उपेंद्र दाते या अभिनेत्यांनी ‘नटसम्राट’ केले. मराठी साहित्य व रंगभूमीवर अजरामर ठरलेल्या या नाटकावर चित्रपट काढण्याची घोषणा तीन वर्षांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केली होती. या चित्रपटातील मुख्य भूमिका महानायक अमिताभ बच्चन साकारणार असल्याची चर्चा होती. आता मात्र अभिनेते नाना पाटेकर हे नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची, तर त्यांच्या पत्नीची-कावेरीची भूमिका रीमा लागू साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या चित्रपटाचा मुहूर्त येत्या शुक्रवारी (दि. २७) दुपारी १२ वाजता कुसुमाग्रज स्मारक येथे निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत होत आहे. या कार्यक्रमाला नाना पाटेकर, रीमा लागू यांच्यासह दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेदेखील उपस्थित राहणार आहेत. चित्रपटाची निर्मिती विश्वास जोशी हे करीत आहेत. फिनक्राफ्ट मीडिया अॅण्ड एंटरटेन्टमेंट प्रा. लि. व ग्रेट मराठा एंटरटेन्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट निर्माण केला जात आहे. (प्रतिनिधी)
‘नटसम्राट’नाटकावर आधारित मराठी चित्रपट साकारणार
By admin | Updated: February 25, 2015 01:04 IST