मुद्रणालयाचे व्यवस्थापक वर्मांची तडकाफडकी बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 01:43 IST2021-07-30T01:42:10+5:302021-07-30T01:43:26+5:30
चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाखांच्या नोटा गहाळ झाल्याप्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापक यांनी घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याची गंभीर नोंद दिल्लीस्थित मुख्यालयाने घेतली असून, मुद्रणालय मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या महाव्यवस्थापकपदी तडकाफडकी बदली केली आहे.

मुद्रणालयाचे व्यवस्थापक वर्मांची तडकाफडकी बदली
नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाखांच्या नोटा गहाळ झाल्याप्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापक यांनी घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याची गंभीर नोंद दिल्लीस्थित मुख्यालयाने घेतली असून, मुद्रणालय मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या महाव्यवस्थापकपदी तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या जागी हैदराबाद सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसचे बोलेवार बाबू यांची नियुक्ती केली आहे. या साऱ्या प्रकारास जबाबदार असलेल्यांची पोलीस व इतर समित्यांनी केलेल्या चौकशीत दोषी आढळून आलेल्यांच्या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. चलार्थपत्र मुद्रणालयातून फेब्रुवारीत पाचशे रुपयांचे दहा बंडलचे एक पाकीट गहाळ झाल्याचे कामगारांच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर बाब तत्काळ वरिष्ठांना कळवली. प्रारंभी या नोटांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. चौकशीसाठी व्यवस्थापनाने द्विसदस्यीय फॅक्ट फायडिंग कमिटीची स्थापना केली. मात्र याच काळात कोरोनामुळे मुद्रणालय बंद झाल्याने तपास थंडावला होता. नोटा गहाळ अथवा चोरी झाल्याचा उलगडा होत नसल्याने १३ जुलै रोजी उपनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नोडल अधिकाऱ्याच्या मदतीने मुद्रणालयातील प्रचलित कामाची पद्धत समजून घेतली. पोलीस पथकाने नोटा छपाई, कटिंग, स्ट्राँग रूम, एक्झामिनेशन विभाग, पॅकिंग विभाग याची सविस्तर माहिती घेऊन गांभीर्याने तपास सुरू केला. त्यात कट पॅक विभागातील दोघा सुपरवायझरपर्यंत तपासाची सुई अटकून येऊन थांबत होती. पोलिसांनी दोघा सुपरवायझर यांना पोलीस ठाण्यात पाचारण केल्यानंतर त्यांनी दोन दिवसाचा अवधी मागितला. सुपरवायझर सुरेश रेड्डी व त्याग राजन या दोघांनी मुख्य व्यवस्थापक यांच्याकडे कामाचा ताण व झालेल्या चुकीमुळे पाचशे रुपयाच्या नोटांच्या बंडलाचे पाकीट हे चुकून पंचिंग झाल्याचे सांगितले. पोलीस तपासामध्ये नोटा चोरीस गेल्या नसून हलगर्जीपणामुळे त्या पंचिंग झाल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी दोघा सुपरवायझर यांना निलंबित करण्यात आले आहे.
या सर्व प्रकाराचा शहर पोलीस, फॅक्ट अँड फाइंडिंग कमिटी, मुद्रणालय महामंडळ विशेष समिती अशा तीन स्तरावरून तपास सुरू आहे. याबरोबर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडूनदेखील तपास सुरू आहे. या सर्व घटनेची गांभीर्याने दखल घेत दिल्लीतून बुधवारी चलार्थपत्र मुद्रणालयाचे मुख्य महाप्रबंधक एस एल वर्मा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
चौकट====
निलंबनाची कारवाई प्रलंबित
शहर पोलीस व मुद्रणालय महामंडळ विशेष समिती यांनी केलेल्या तपासामध्ये काही उच्चस्तरीय अधिकारी व कामगार यामध्ये दोषी आढळून आल्याने तसा प्रस्ताव व्यवस्थापनाकडे दिला आहे. त्यानुसार काही अधिकारी व कामगार यांचे निलंबन ऑर्डर तयार आहे. मात्र त्याच्यावर सही न झाल्याने निलंबनाची ऑर्डर प्रलंबित आहे. मुद्रणालयाचे मुख्य व्यवस्थापक रुजू झाल्यानंतर निलंबनाची ऑर्डर निघण्याची शक्यता आहे.
चौकट==
सीसीटीव्ही फुटेजचे काय
मुद्रणालयामध्ये सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात नोटांच्या बंडलाचे पाकीट गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. कट पँक व पॅकिंग विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. तर मग याचा प्रारंभी तपास करण्यासाठी नेमलेल्या फॅक्ट फायडिंग कमिटीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले की नाही किंवा ते कॅमेरे बंद होते याचा तपासामध्ये उलगडा होणे गरजेचे आहे.