मालेगावी ४७ मजूर ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:32 IST2020-04-16T20:12:21+5:302020-04-17T00:32:44+5:30
मालेगाव मध्य : शहरालगतच्या मनमाड चौफुली येथे रात्री दीडच्या सुमारास ४७ परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारा एका बारा चाकी वाहनास किल्ला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मालेगावी ४७ मजूर ताब्यात
मालेगाव मध्य : शहरालगतच्या मनमाड चौफुली येथे रात्री दीडच्या सुमारास ४७ परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणारा एका बारा चाकी वाहनास किल्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालक फरार झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण देश लॉकडाउन करीत संचारबंदी लागू आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर शासनाने निर्बंध घातले आहे. असे असतानाही चालक जगदीश पोखरजी रेगर चित्तोडगढ याने बाराचाकी वाहनातून (क्र. आरजे ०९ जीव्ही ६७२५) ४७ मजुरांना घेऊन जात होता. मनमाड चौफुलीवर किल्ला पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना या वाहनावर संशय बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यात मजूर बसल्याचे आढळून आले. चालक फरार झाला असून मजुरांमध्ये ४१ पुरुष, पाच महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. सर्व मजूर पुणे, सोलापूर परिसरात कामानिमित्ताने गेले होते. लॉकडाउनमुळे हाताला काम नाही, जवळ असलेले पैसेही संपल्याने पोट भरण्याच्या विवंचनेत असतानाच सरकारने लॉकडाउनमध्ये मुदतवाढ केली. यामुळे मजुरांचा संयम सुटल्याने हजारो किलोमीटर अंतरावरील घरं गाठण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील मजुरांचा समावेश असून, पायी येत असताना ते शिक्रापूर, शिर्डी अशा ठिकाणांहून वाहनात बसले होते.
पोलिसांनी सर्व मजुरांना नियंत्रण कक्ष आवारात आणून सकाळी त्यांची नाश्त्याची व्यवस्था केली होती. त्यांची देवळा येथील निवारागृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक जप्त केला आहे तर फरार वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार बबन सूर्यवंशी हे करीत आहेत.