मालेगावी १६ तलवारी जप्त; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 17:56 IST2019-03-20T17:56:02+5:302019-03-20T17:56:41+5:30
मालेगाव : मालेगावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने आझादनगर परिसरात सापळा रचून तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून १६ धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी मोहंमद यासीन मोहंमद शकील (१९) रा. हकीमनगर, मालेगाव, कासीम अन्सारी जलाउद्दीन अन्सारी (२०) रा. मोमीनपुरा, समीर अहमद बशीर अहमद (२२) रा. हकीमनगर यांचेविरुद्ध आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मालेगावी १६ तलवारी जप्त; तिघांना अटक
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व अवैध धंद्यांचे उच्चाटन व्हावे यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह व अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली. आज मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील आझादनगर परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेवून १६ धारदार तलवारी हस्तगत केल्या तर पवारवाडी पोलिसांनी आॅल आऊट गस्ती दरम्यान दातारनगर परिसरातून एका संशयितास ताब्यात घेवून त्याच्या कब्जातून देशी बनावटी पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केली. आज (दि.२०) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी आझादनगर परिसरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेण्यासाठी गस्त घालीत होते. दरम्यान, पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरुन काही इसम आझादनगर परिसरात इसहाक हॉटेलसमोर अवैधरित्या धारदार शस्त्रे बाळगून संशयितरित्या वावरत असल्याचे समजले. यामुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून मोहंमद यासीन मोहंमद शकील, कासीम अन्सारी जलाउद्दीन अन्सारी व समीर अहमद बशीर अहमद यांना आझादनगर व म्हाळदे शिवारातून ताब्यात घेतले. त्यांच्या कब्जात १६ धारदार तलवारी मिळून आल्यात. सदर इसम विनापरवाना बेकायदेशिररित्या धारदार शस्त्रे कब्जात बाळगताना मिळून आल्याने आझादनगर पोलिसात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.