गाव, खेड्या-पाड्यात माहेरवाशीण गौराई विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:44+5:302021-09-13T04:13:44+5:30

------------------------------------------------------------ ▪️दक्ष राजाची कन्या थेट अवतरते स्वयंपाकघरात लोकमत न्यूज नेटवर्क देवगाव : गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची ...

Mahervashin Gaurai is present in the village | गाव, खेड्या-पाड्यात माहेरवाशीण गौराई विराजमान

गाव, खेड्या-पाड्यात माहेरवाशीण गौराई विराजमान

------------------------------------------------------------

▪️दक्ष राजाची कन्या थेट अवतरते स्वयंपाकघरात

लोकमत न्यूज नेटवर्क

देवगाव : गणपतीची आई, शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या गौरी मोठ्या थाटामाटात विराजमान झाली. माहेरवाशिणीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरीची रविवारी (दि. १२) महिलांनी मुहूर्तावर नटून-थटून पूजा केलीच, पण आजच्या गौरींनाही साजशृंगार तितक्याच उत्साहात केला.

दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात, गाव, खेड्या - पाड्यांत माहेरवाशीण गौरींचे उत्साहात स्वागत झाले. कोरोनाच्या सावटावर मात करत रविवारी (दि. १२) सकाळी ९.४९ वाजता भक्तिभावाने घरोघरी गौराईचे आगमन झाले. खेडोपाडी विशेष परंपरा म्हणजे थेट स्वयंपाकघरात चुलीजवळ या गौराई मातेसाठी आरास मांडली जाते. पाटावर शोभिवंत चादर अंथरून त्यावर तांदळाची रास ठेवून लक्ष्मीच्या रूपाने घरात प्रवेश केलेल्या गौराईचे स्वागत गाव खेड्याच्या ग्रामीण भागात झाले. परंपरेनुसार आणि नवसाच्या म्हणून तांब्याच्या गौरीची सर्वसाधारण जेष्ठा आणि कनिष्ठा अशा दोन गौरींची प्रतिष्ठापना घराघरात केली जाते. तर काही ग्रामीण भागात माती, शाडू किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गौराईमाता बसविण्यात आल्या. पारंपरिक पद्धतीने फुलांच्या खंडयांच्या गौरी बसवल्या जातात. गौरीच्या आकर्षक, सोज्वळ साजिऱ्या छब्या आणि मुखवटे भाविकांनी भक्तिभावाने घरी आणले व पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली.

शेतकऱ्यांनी मात्र पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याला पसंती दिली. घरात समृद्धीच्या पावलांनी ये आणि कोरोनाचा नायनाट कर, अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली. मंगळवार, १४ सप्टेंबरला पाच दिवसांच्या गणपतींसोबत गौरीलाही निरोप दिला जाणार आहे. पण ह्या एक-दोन दिवसात गौरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत. गौराईमाता म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीण आहे, अशी श्रद्धा ग्रामीण भागात आहे.

इन्फो

पाना-फुलांची सजावट

जंगलातील विविध वेली, गौराईच्या नावे असणारे इंदूचे, शीडीचे फूल, गाय गोमेटीची वेल, दिंडीच्या पानात हिरवाई गौराईमाता तयार केली जाते. या हिरवाई गौराई मातेला मंगळसूत्र, बांगड्या, नथ आदी आभूषणे घातली जातात. घरात तांबड्या मातीचे पट्टे ओढून त्यावर तांदळाच्या पीठाने गौराईची पावले उमटवली जातात. माहेरी आलेली गौराई माता संपूर्ण घरात आनंदाने भरल्या मनाने व प्रेमाने वास्तव्य करते. गौरीला नैवेद्यासाठी शेपूच्या भाजीसह सोळा शाकाहारी भाज्या करण्याची प्रथा आहे, तर गौरीच्या पूजेला पुरणपोळीचा नैवेद्य असतो. गौराई मातेला अळू, भेंडी, माठाची भाजी यांचा नैवेद्य दाखवला जातो. खेड्या-पाड्यांत अळूचे पान, तांदळाचे पीठ यापासून पातवड नावाचा पदार्थ बनवला जातो. काही घरांमध्ये परंपरेनुसार श्रावण मासातील शाकाहारी व्रताची सांगता यामुळे होते.

--------------

फोटो - १२ गौराई

खेड्या- पाड्यांत विराजमान झालेली माहेरवाशीण गौराई

Web Title: Mahervashin Gaurai is present in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.