महावीर जयंती रॅलीत चित्ररथ ठरले लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 16:03 IST2018-03-29T16:03:55+5:302018-03-29T16:03:55+5:30
सामाजिक जनजागृती : पथनाट्य, चित्ररथांद्वारे प्रबोधन

महावीर जयंती रॅलीत चित्ररथ ठरले लक्षवेधी
नाशिक : भगवान महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जैन सेवा संघ, विविध जैन संघटना यांच्यावतीने शहरातून गुरुवारी (दि.२९) काढण्यात आलेल्या रॅलीत ‘गोसेवा’, ‘अन्नाची नासाडी थांबवा’, ‘डिजीटल पाठशाळा’ आदि विषयांद्वारे जनजागृती करण्यात आली. पांढरी वस्त्रे परिधान केलेले पुरुष व केशरी साड्या व फेटे परिधान केलेल्या जैन महिलांनी मिरवणुकीची शोभा वाढवली. दहीपुलावरील श्री धर्मनाथ देरासर मंदिरापासून शोभायात्रेची सुरवात झाली. ही शोभायात्रा तांबटलेन, भद्रकाली, गाडग ेमहाराज पुतळा, मेनरोड, रविवार कारंजा, रविवारपेठ, गंगापूर रोडमार्गे काढण्यात आली. चोपडा बॅँक्वेट हॉल येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेच्या माध्यमातुन जैन समाजाने विविध संदेश देत राष्टÑीय एकात्मतेची प्रचिती आणून दिली. अबालवृद्ध, युवक युवती मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
मिरवणुकीच्या अग्रस्थानी सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी चित्ररथांवर ‘स्त्री भृण हत्या थांबवा’, ‘गोसेवा’, ‘अन्नाची नासाडी थांबवा’, ‘हेल्मेटचे महत्व ओळखा’ आदि विविध सामाजिक संदेश देण्यात आले होते. शोभायात्रेचे ठिकाठिकाणी स्वागत करण्यात आले. शोभायात्रेचा समारोप चोपडा हाल येथे करण्यात आला. तेथे साध्वी प्रितीसुधाजी, मधुस्मिताजी यांनी भगवान महावीरांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. प्रवचन केले. या प्रवचनातुन समाजबांधवांना भगवान महावीरांचे आचार व विचार आचरणात आणण्याचा हितोपदेश करण्यात आला. त्यानंतर ‘महावीर अस्ताका’चे सामुदायिक पठण करण्यात आले. जैन समाजातील विविध क्षेत्रातील २१ मान्यवरांचा यावेळी नवाकाररत्न पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सचिन गांग यांनी सुत्रसंचालन केले. पवन पाटणी यांनी स्वागत केले. याप्रसंगी जैन सेवा संघाचे ललित मोदी, जयेश शहा,राजेंद्र पहाडे, सुवर्णा काला, विजय लोहाडे, संजय कोचर आदिंसह जैन सोशल ग्रुप, जैन सहेली ग्रुप, प्लॅटिनम ग्रुप, सकल जैन समाज, जिओ लेडिज विंग सदस्या आदिंसह आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.