Maharashtra should stand behind Sharad Pawar - Sanjay Raut | महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठीशी उभे राहावे - संजय राऊत

महाराष्ट्राने शरद पवारांच्या पाठीशी उभे राहावे - संजय राऊत

नाशिक : महाराष्ट्राने देशाच्या राजकारणाची दिशा बदलायला सुरुवात केली असून, बदलाची प्रक्रिया सुरू करणारे राज्य म्हणून महाराष्ट्र केंद्रस्थानी राहिले आहे. अशा महाराष्ट्राचा मराठी माणूस म्हणून शरद पवार यांनी दिल्लीच्या तख्तावर बसावे व त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने  पवार यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी भावना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बोलून दाखविली.

ऊर्जा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जाहीर मुलाखतीत संजय राऊत बोलत होते. राजकीय विश्लेषक राजू परूळेकर यांनी ही मुलाखत घेतली. राज्यातील सत्ता बदलाचा विचार कधी मनात आला, या पहिल्याच प्रश्नावर राऊत यांनी, ज्या दिवशी शरद पवार यांना सरकारने ईडीने नोटीस पाठविली त्याचदिवशी भारतीय जनता पक्षाविषयी व त्या सरकारविषयी आपल्या डोक्यात ठिणगी पडली. सत्तेवर बसलेली मंडळी देशात विद्वेषाचे राजकारण करीत असल्याचे व विष पेरीत असल्याचे पाहून देश तुटतो की काय, अशी भीती आपल्याला वाटू लागली होती व त्यातूनच सत्तेवरची मंडळी नको असा विचार पुढे आला.

राज्यात सत्ताबदल होईल याविषयी मी व शरद पवार आम्ही दोघे ‘कॉन्फीडन्ट’ होतो मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यात आपण शिल्पकार नसून शरद पवार यांनाच ते श्रेय द्यावे लागेल, असेही राऊत म्हणाले. गांधी घराण्याच्या त्यागाच्या आसपासदेखील कोणतेही घराणे जाऊ शकत नाही, असे सांगतानाच पंडित नेहरू यांनी देश घडविण्यासाठी जे काही केले तेच आज एकेक करून विक्री करण्याचा घाट घातला जात असल्याचे सांगून राऊत यांनी केंद्र व मोदी सरकारला चिमटा काढला.

Web Title: Maharashtra should stand behind Sharad Pawar - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.