एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 16:30 IST2022-04-03T16:29:38+5:302022-04-03T16:30:04+5:30
Raj Thackeray : शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचंही नाव घेतलं होतं.

एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला
शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. दरम्यान, यावर बोलताना छगन भुजबळ यांनी ते पाहिल्यानंतर ती मनसेची जाहीर सभा होती की भाजपची होती हेच समजलं नसल्याचं म्हणत टोला लगावला.
"राज ठाकरे यांनी नेहमीच भाजपला कडवा विरोध केला आहे. त्यांचं काही समजतच नाही. भाजपच्या विरोधात बोलताना, एकदा काय ईडीनं बोलावलं ते इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं. कोहिनूर टॉवर हलायलाच लागला त्यांचा. त्यांना जे काही करायचं त्यांनी स्पष्ट सांगावं. भाजपची बी टीम म्हणून काम करत असतील तर ते जाहीर करावं," असं भुजबळ म्हणाले. नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
"राज ठाकरे बोलतात चांगलं म्हणून लोक बघायला जातात. परंतु ते पुढे जे वागतात ते लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणून कार्यकर्त्यांनाही आपल्या इंजिनाचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे कळत नाही," असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपचा प्रचारच ते करत होते. फक्त भाजपचे झेंडे वगैरे लावले नव्हते. बाकी सर्वकाही तसंच होतं. त्यांनी आपला ट्रॅक बदललाय, पण भाजप त्यांना घेतंय का हे पाहावं लागणार असल्याचंही भुजबळ म्हणाले.