टाळ मृदंगाच्या गजराने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 07:46 IST2023-01-18T07:42:32+5:302023-01-18T07:46:22+5:30
श्री निवृत्तिनाथांच्या समाधीची महापूजा आज पहाटे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

टाळ मृदंगाच्या गजराने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली; पालकमंत्र्यांच्या हस्ते महापूजा
वसंत तिवडे
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) - धन्य धन्य निवृत्ती देवा
काय महिमा वर्णावा
शिवअवतार धरून
केले त्रैलोक्य पावन
समाधी त्र्यंबक शिखरी
मागे शोभे ब्रह्मगिरी
असा संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथांचा यांचा आदरयुक्त गौरव संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात केला आहे. दिंडी म्हणजे केवळ हौस नाही की मौज नाही, दिंडी म्हणजे साधना आहे. शहरात सर्वत्र संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, निवृत्तिनाथांचे वारकऱ्यांच्या मुखातून ऐकू येत आहेत. संपूर्ण त्र्यंबक शहर दिंड्या, पताका, टाळ मृदंगाच्या गजराने दुमदुमले आहे. शहरात गंगाद्वार पवित्र गोदामायीचे उगमस्थान ब्रह्मगिरी तसेच नीलपर्वतावरील निलांबिका माता या ठिकाणी वारकरी, भाविकांची रीघ लागली आहे.
श्री निवृत्तिनाथांच्या समाधीची महापूजा आज पहाटे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी श्री संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील, आमदार हिरामण खोसकर, भाजपचे नेते लक्ष्मण सावजी संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. पौष वद्य दशमी या दिवशी लाखो भाविक वारकरी यांचा जणू वैष्णवांचा अथांग जनसागरच जमला आहे. सर्व पायी दिंड्या आपापल्या ठिकाणी विसावल्या आहेत. सलग दोन वर्षे कोविडच्या संसर्गाच्या लॉकडाऊनमध्ये सर्वच यात्रा, जत्रा आदी गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर शासनाने निर्बंध लादले होते. यावर्षी निर्बंधमुक्त वातावरणात यात्रा होत असल्याने वारकरी, भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. निवृत्तिनाथ संजीवन समाधी संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील यांनी यंदा भाविक मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी आल्याचे सांगितले.
त्र्यंबकेश्वर (नाशिक)- संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची महापूजा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आली. pic.twitter.com/XdAeSwr9Wd
— Lokmat (@lokmat) January 18, 2023
निवृत्तिनाथ महाराजांचा जय जयकार
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम...
पंढरीनाथ महाराज की जय..
निवृत्तिनाथ महाराज की जय..!
असा जयघोष करीत सकाळपासूनच बस, ट्रॅक्टर, ट्रक व पायी दिंड्यांमधून निवृत्तिनाथ महाराजांचा जय जयकार सुरू राहिला.
चोख पोलीस बंदोबस्त
कायदा आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ग्रामीण माधुरी कांगणे केदार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्तासाठी दोन उपविभागीय पोलिस अधिकारी,३२ अधिकारी १९८ पोलिस कर्मचारी यामध्ये ३५ महिला कर्मचारी, २२५ होमगार्डस् त्यात ४० महिला होमगार्डस् तैनात केले आहेत.
पुढील तीन दिवस जवळपास २३० बसेसची व्यवस्था
संतश्रेष्ठ श्री. निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवासाठी राज्यभरातून आलेले भाविक त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करीत असल्याने या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ही वारी करत आहेत. मंगळवार (दि.१७) पासून सीबीएस आणि त्र्यंबकरोड वरील जव्हार फाटा येथून भाविकांसाठी बसेस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांनी वाहतूक करण्यासाठी महामंडळाने आजपासून पुढील तीन दिवस जवळपास २३० बसेसची व्यवस्था केली आहे. यात्रेसाठी लाखो भाविक नाशिकमार्गे त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महामंडळाने भाविकांसाठी बसेस आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन केले आहे.