इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
By Admin | Updated: October 17, 2016 00:39 IST2016-10-16T23:20:18+5:302016-10-17T00:39:16+5:30
विस्कळीत नियोजन : नागरिकांमध्ये नाराजी

इंदिरानगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
इंदिरानगर : गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात अवेळी आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरात पाणीपुरवठ्याच्या नियोजनानुसार पुरवठा होत असताना इंदिरानगरला मात्र पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळले जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
इंदिरानगर येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी शहरात एकवेळ पाणीपुरवठा केला जात असताना नागरिकांना पुरेसे पाणी मिळत होते. परंतु आता नव्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन केले असतानाही पाणी मिळत नसल्याने पालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथे गेल्या दहा दिवसांपासून श्रीकृष्ण कॉलनी, जाखडीनगर, गणेशनगर, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, सिद्धी विनायक सोसायटी, शास्त्रीनगर या परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. परिसरात केवळ अर्धा तासच तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सणासुदीचा काळ असतानाही अचानक अघोषित पाणी कपात करण्यात आलीच कशी असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाकडून कोणतेही कारण दिले जात नसल्यामुळे नागरिकांच्या संतापात अधिकच भर पडली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.