मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेवाचा महामस्तकाभिषेक
By Admin | Updated: February 6, 2016 00:40 IST2016-02-06T00:05:06+5:302016-02-06T00:40:14+5:30
सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेवाचा महामस्तकाभिषेक
सटाणा : बागलाण तालुक्यातील श्रीक्षेत्र मांगीतुंगी पर्वतावर १०८ फूट उंच भगवान ऋषभदेवाची पूर्वमुखी मूर्ती अखंड पाषाणात कोरण्यात आली आहे. मूर्तिकारांचा या मूर्तीवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू असून, आशिया खंडात सर्वात उंच ठरणाऱ्या या विशालकाय मूर्तीच्या येत्या ११ फेब्रुवारीपासून होणाऱ्या पंचकल्याणक व महामस्तकाभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्यास पंचवीस लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या कामासाठी शासनाने अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या निधीला गेल्या महिन्यात मंजुरी दिल्यामुळे सर्व कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.
ज्ञानमतीमाता यांच्या संकल्पनेतून श्रीक्षेत्र मांगीतुंगी शिखराच्या मांगीगिरीवर २००२ सालात भगवान ऋषभदेवाची १०८ फूट मूर्ती तयार करण्यासाठी चंदनामतीमाता, हस्तिनापूरचे पीठाधीश रवींद्रकीर्ती स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पन्नालाल पापडीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मूर्तिनिर्माण समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पुणे येथील भूगर्भ शास्त्रज्ञ बी. एम. करमरकर, व्ही. व्ही. गायकवाड, सी. आर. पाटील, एच. डी. मेढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीकरिता लागणाऱ्या अखंड पाषाणासाठी
शोधकार्य सुरू करण्यात आले. तब्बल दहा वर्षांच्या शोधकार्यानंतर सन २०१२ मध्ये भूगर्भ शास्त्रज्ञांना अखंड पाषाण शोधण्यात यश आले. पर्वताच्या पायथ्यापासून सुमारे दोन हजार पाचशे फूट उंचावर सापडलेल्या या १८४ चौरस मीटर अखंड पाषाणात २०१२ च्या अखेरीस आशिया खंडात प्रसिद्ध असलेले राजस्थान (जयपूर) येथील मूर्तिकार मूलचंद नाहटा, सूरजमल नाहटा, आशिष नाहटा यांच्या मार्गदर्शनाखाली दीडशे कारागिरांनी मूर्ती कोरण्याच्या कामास प्रारंभ केला. मूर्तिकारांनी रात्रंदिवस काम केल्यानंतर गेल्या महिन्यात मूर्ती कोरण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. येत्या ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मूर्ती प्रतिष्ठापना व महामस्तकाभिषेक सोहळ्याच्या दृष्टीने या विशालकाय मूर्तीवर मूर्तिकारांचे अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे.
सोहळ्यानिमित्त भरणार मेळा
या भव्य सोहळ्यानिमित्त भाविकांच्या मनोरंजनासाठी मेळा भरविण्यात आला आहे. त्यासाठी दहा एकर क्षेत्रावर स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळ्यात पाळणे, सर्कस, दुकाने थाटण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या सोहळ्याला एकप्रकारे यात्रोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय सोहळा म्हणून घोषित केले आहे. मूर्तिनिर्माण समितीतर्फेया सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शासनस्तरावरदेखील युद्धपातळीवर काम सुरू असून, मांगीतुंगीच्या विकासासाठी मंजूर असलेल्या २७५ कोटी रु पयांच्या निधीपैकी पहिल्या टप्प्यात चाळीस कोटी रुपयांच्या निधीला शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. या निधीमधून मांगीतुंगी फाटा ते मांगीतुंगीपर्यंत रस्ता रु ंदीकरण व डांबरीकरणाच्या कामाबरोबरच अंतर्गत रस्ते, स्वच्छतागृह बांधणे, लिफ्ट तयार करणे, रेलिंग तयार करणे, बांधकामे आणि पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यासाठी हरणबारी धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. शासनाच्या सहकार्यामुळे हे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला येऊन संपूर्ण बागलाणचा कायापालट होण्यास मदत होणार आहे.
- संजय पापडीवाल, महामंत्री, मूर्तिनिर्माण समिती, मांगीतुंगी