ढगाळ हवामानासह बरसल्या हलक्या सरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:24 IST2020-07-06T00:24:28+5:302020-07-06T00:24:45+5:30
शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ढगाळ हवामानासह बरसल्या हलक्या सरी !
नाशिक : शहर व परिसरात रविवारी (दि.५) पहाटे सुमारे अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम राहिले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्येही अधूनमधून हलक्या सरींचा वर्षाव झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर वाºयाचा वेग वाढला असून, दोन दिवसांपासून पाऊसही जोरदार सुरू आहे. यामुळे शहराच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे. पुढील दोन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला आहे. यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातही पाऊस या पुढील दोन दिवसांत जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरातदेखील वाºयाचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.
रविवारी (दि.५) पहाटे शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सकाळी नाशिककरांना सूर्यदर्शन झाले नाही. सकाळपासून नभ दाटून आल्याने दिवसभर सूर्यप्रकाश गायब राहिला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाने काही भागांत हजेरी लावली. मात्र, पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ पहावयास मिळाला.
शहरात पहाटे १.२ मिलीमीटर, तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केवळ ०.६ मिलीमीटर पाऊस पेठरोडवरील हवामान निरीक्षक केंद्राकडून नोंदविला गेला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह वडाळा, इंदिरानगर, जुनेनाशिक, द्वारका, उपनगर, आंबेडकरनगर या भागात दमदार सरींचा वर्षाव झाला मात्र वारा सुुटल्यामुळे सरी अल्पवेळच टिकू शकल्या. रविवारची सुटी आणि संध्याकाळनंतर संचारबंदी व जमावबंदी आदेशाची केली जाणारी काटेकोरपणे अंमलबजावणी यामुळे रस्त्यांवर फारशी वर्दळ पहावयास मिळाली नाही.