पोलिसांनी गिरविले योगासनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:45 IST2019-06-22T00:44:35+5:302019-06-22T00:45:02+5:30
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यात ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला.

पोलिसांनी गिरविले योगासनाचे धडे
नाशिक : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयात योग दिवस साजरा करण्यात आला. यात ४०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होत विविध प्रकारची योगासने करून योगाभ्यास केला.
पोलीस मुख्यालयातील बॅरेक क्रमांक १४ येथे शुक्रवारी (दि.२१) सकाळी ६.३० वाजता आत्मियता योगा व हेल्थ सेंटर यांच्यातर्फे या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास करताना विविध योगासनांचे धडे गिरविले. प्रारंभी प्रार्थना त्यानंतर वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, पर्वतासन, शवासन, हलासन असे उभे आसन प्रकार तसेच भद्र्रासन, शशांकासन, वक्रासन असे बैठे आसन प्रकारांसोबतच कपालभाती, प्राणायाम, शांतीपाठ अशी योगसाधना यावेळी करण्यात आली. दरम्यान, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पोलिसांचे जीवन धावपळीचे तसेच सातत्याने तणावपूर्ण असते. कोणत्याही क्षणी, रात्री अपरात्री सज्ज रहावे लागते. याचा परिणाम प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनावर तसेच कुटुंबीयांवरही होत असतो. अशा परिस्थितीत आपले शारीरिक व मानसिक आरोग्य जपण्यासाठी योगसाधना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, पौर्णिमा चौघुले, अमोल तांबे, माधुरी कांगणे, सर्व सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सीआयआय उत्तर महाराष्ट्र परिषद
सीआयआय उत्तर महाराष्ट्र परिषद आणि निरामय साधना फाउंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. योगशिक्षक राहुल भंडारी यांनी योगाभ्यास घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून तुषार उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार पटवर्धन उपस्थित होते. योग हा स्वस्थ आणि टिकाऊ जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम उपलब्ध उपाय आहे. योगाच्या मदतीने दीर्घ जीवनशैलीचा आनंद घेता येतो, असे पटवर्धन यांनी सांगितले. सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे अध्यक्ष गणेश कोठावदे यांनी प्रास्तविक केले.साधना फाउंडेशनचे अध्यक्ष जे. पी. जाधव यांनी स्वागत केले. सीआयआय उत्तर महाराष्ट्र विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष दीपक कुलकर्णी, गोरक्षनाथ नवले यांनीही मार्गदर्शन केले. विविध आस्थापनातील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.