नाशिकच्या सावरकरनगरात बिबट्याचा पुन्हा थरार; वन अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 14:13 IST2019-02-17T14:07:37+5:302019-02-17T14:13:24+5:30
जवळपास चार तासापासून शोध मोहीम सुरू होती. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर बिबट्या एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला.

नाशिकच्या सावरकरनगरात बिबट्याचा पुन्हा थरार; वन अधिकारी जखमी
नाशिक : सावरकरनगर परिसरात बिबट्याचा पुन्हा थरार अनुभवायला मिळाला. रविवारी सकाळी नऊ वाजेपासून बिबट्याने या भागात दर्शन दिले होते. त्यानंतर वन विभागाचे रेस्क्यू पथक परिसरात दाखल झाले. मात्र, सावरकर नगरमध्ये बिबट्या कुठे दडून बसला हे शोधणे कठीण बनले होते. बिबट्याच्या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाले आहेत.
जवळपास चार तासापासून शोध मोहीम सुरू होती. मात्र, बिबट्या आढळून आला नाही. दरम्यान, नागरिकांची गर्दी कमी झाल्यानंतर बिबट्या एका बंगल्यातून अचानकपणे बाहेर आला. त्यामुळे पुन्हा परिसरात घबराट पसरली आहे. वनविभागाचे पथक याच भागात असल्यामुळे तत्काळ त्याचा माग काढणे बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नात वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार बिबट्याचा हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळा निर्माण होत आहे. सावरकर नगर हा परिसर गोदा काठापासून जवळ असल्यामुळे या भागात बिबट्या खाद्याच्या शोधात आला असावा आणि पहाट झाल्यावर दडून बसला, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.
25 जानेवारी रोजी याच परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या यश आले होते. त्यावेळी देखील बिबट्याने सावरकर नगर भागामध्ये धुमाकूळ घातला होता. नागरिकांच्या गोंगाटात गोंधळ, दगडफेक यामुळे बिबट्या बिथरला होता.