नाशिक : जिल्ह्यात ‘रोडकिल’ची समस्या अद्यापही कायम आहे. शहरातून जाणारे मुख्य राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर रस्ते अपघातात वन्यप्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पुर्व वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि.१४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास महामार्गावरील नागापूर फाट्याजवळ एक बिबट मृतावस्थेत पडल्याची माहिती जागरूक नागरिकांकडून येवला वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाली. वनक्षेत्रपाल संजय भंडारी यांनी तत्काळ वनपाल जी.बी.वाघ, वनरक्षक भय्या शेख, आर.एल.बोरकडे आदिंसह धाव घेत घटनास्थळावरून अंदाजे ४ वर्षे वयाच्या बिबट मादीचा मृतदेह ताब्यात घेत शासकिय वाहनातून निफाड रोपवाटिकेत आणण्यात आला. बुधवारी (दि.१५) सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रवींद्र चांदोरे यांच्यामार्फत बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेहाचे दहन करण्यात आले.सहा महिन्यांत दुसरा मृत्यूनिफाड तालुक्यातील नैताळे येथे सहा महिन्यांपुर्वी बिबट्याचा अपघाती मृत्यू झाला होता. यानंतर हा दुसरा बिबट्या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडला. मागील तीन वर्षांमध्ये सुमारे अर्धा डझन बिबटे येवला परिक्षेत्रांतर्गत वाहनांच्या धडकेत ठार झाले आहेत.