बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 22:15 IST2021-09-18T22:14:32+5:302021-09-18T22:15:04+5:30
देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपालक चिंतेत सापडला आहे.

बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा
देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपालक चिंतेत सापडला आहे.
टाकेदेवगाव परिसरातील येल्याचीमेट शिवारात चार ते पाच दिवसांपूर्वी काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर यांनी आपल्या शेळ्या चारण्यासाठी वनविभागाच्या आरक्षित जंगलामध्ये चारत असताना, संध्याकाळच्या वेळी बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढविला. काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर यांना शेळीच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी शेळीकडे धाव घेतली. शेळीचे लचके तोडत असलेल्या बिबट्याला या दोघांनी दगड-गोट्यांच्या साहाय्याने पिटाळून लावले. मात्र, बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने बाकीच्या वीस ते तीस शेळ्या सैरभैर पळत सुटल्या. पुन्हा बिबट्याने दुसऱ्या शेळीवर हल्ला चढवून तिचा फडशा पाडला.
आरक्षित जागेत बिबट्यासह इतर जंगली जनावरांचा वावर असल्याने, ती त्यांचीच जागा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पिंजरा नाही लावू शकत. बिबट्याने मनुष्यवस्तीकडे वाटचाल केल्यास मालकीहक्काच्या जागेमध्ये बिबट्यास जेरबंद करण्यास पिंजरा लावता येतो.
- खंडू दळवी, वनरक्षक, टाकेदेवगांव.