बिबट्याची दुचाकीला धडक; मध्यरात्रीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 15:34 IST2021-05-05T15:30:47+5:302021-05-05T15:34:46+5:30
शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापुर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचे वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला.

बिबट्याची दुचाकीला धडक; मध्यरात्रीचा थरार
नाशिक : येथील सिंहस्थनगररोडवरील सेंट लॉरेन्स शाळेपासून हाकेच्या अंतरावर मंगळवारी (दि.४) मध्यरात्री सुमारे पाऊण वाजेच्या सुमारास कॉलनी रस्त्यावरुन चालत आलेल्या बिबट्याने मुख्य रस्ता वेगाने ओलांडताना दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार शिवम दिगंबर गायकवाड (२३) युवक रस्त्यावर फेकला गेला आणि बिबट्यानेही घाबरुन धूम ठोकली. सुदैवाने यावेळी बिबट्याने युवकावर हल्ला केला नाही, अन्यथा अनर्थ घडला असता. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे रात्र गस्तीच्या पथकाने घटनास्थळ गाठत बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता बिबट्या पांडवलेणी जंगलाच्या दिशेने धावत जात असल्याचे त्यांना दिसले.
शिवम हा त्याच्या मित्राची आई पाथर्डीफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असल्याने मित्राला भेटण्यासाठी गेला होता. तेथून रात्री आपल्या राहत्या घराकडे परतत असताना रात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास सिडकोतील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या जवळच शिवमला अचानक बिबट्या मुख्य रस्त्यावर कॉलनीच्या जोड रस्त्याने येत असल्याचे दिसले. यावेळी शिवम बिबट्याला बघून घाबरला आणि त्याने त्याच्या मुख्य रस्त्यावर येण्यापुर्वीच दुचाकीचा वेग वाढवून तेथून मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याचे वेगाने धावल्याने तो थेट शिवमच्या दुचाकीला येऊन धडकला. यामुळे शिवम रस्त्यावर कोसळून गंभीररित्या जखमी झाला. यावेळी सुदैवाने बिबट्या पुन्हा माघारी फिरून शिवमकडे न येता पुढे पळून गेला आणि शिवमचा जीव भांड्यात पडला.
---
शाळेच्या सीसीटीव्हीत कैद
बिबट्या रस्त्यावरुन धावत येत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरुन आतमध्ये झेप घेतो आणि कही वेळेत पुन्हा बाहेर पडत असल्याची घटना सेंट लॉरेन्स शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात पाहणी करत बिबट्याचा माग काढला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले असता प्रौढ बिबट्या सुमारे चार वर्षे वयाचा असल्याची माहिती भदाणे यांनी दिली. नागरिकांनी अफवा पसरवू नये, आणि अफवांवर विश्वास ठेवून नये, रात्रीच बिबट्या पांडवलेणीच्या राखीव जंगलाच्या दिशेने गेल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बघितले आहे.
--