कासारवाडीत बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 00:31 IST2021-12-28T00:30:05+5:302021-12-28T00:31:21+5:30

सिन्नर : तालुक्यातील कासारवाडीत बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे.

Leopard attack in Kasarwadi | कासारवाडीत बिबट्याचा हल्ला

कासारवाडीत बिबट्याचा हल्ला

ठळक मुद्देतिसरी घटना : सिन्नर तालुका परिसरात दहशत

सिन्नर : तालुक्यातील कासारवाडीत बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी (दि.२६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या काही दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे.

विलास महाराज कांडेकर हे रात्री दुचाकीवरून गावातून मळ्यात निघाले होते. बाळूमामा देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर माधव शेळके यांच्या मळ्याजवळ ते आले असता अचानक एक बिबट्या त्यांच्या दुचाकीला आडवा आला. अचानक बिबट्यासमोर आल्याने कांडेकर यांनी दुचाकीचा वेग वाढवल्याने बिबट्याने दुचाकीचा पाठलाग करत त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने कांडेकर यांनी तेथून पळ काढल्याने त्यांना काही झाले नाही.

मात्र, या मादी बिबट्यासोबत तिचे बछडे असल्याचे बघायला मिळाले. कांडेकर यांनी गावात येत याबाबत सरपंच सुनील सांगळे व माजी उपसरपंच सचिन देशमुख यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी त्वरित वनरक्षक अक्षय रूपवते यांना संपर्क साधून सदर परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर सोमवारी (दि. २७) याठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, बिबट्याकडून परिसरात सतत होणाऱ्या हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी गावातील देशमुख वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर संदीप कासार हा युवक दुचाकीने जात असताना त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याने पंजा मारल्याने त्याच्या पोटास जखम झाली होती. तेव्हाही परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र, बिबट्या त्यात अडकला नाही. यानंतर काही दिवसांनीच गावातून बाळूमामा देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रतीक देशमुख यांच्या चारचाकीला बिबट्या आडवा झाला होता.

मात्र, चारचाकी असल्याने बिबट्याला काही करता आले नाही. यावेळी देशमुख यांनी बिबट्याचा मुक्त वावर आपल्या मोबाइलमध्ये कैद केला होता. मात्र, रविवारी कांडेकर यांच्यावर हल्ला झाल्यावर त्या बिबट्यासोबत बछडा असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे तो मादी बिबट्या असल्याचे समोर आले असून, जवळपास असलेल्या उसाच्या शेतात या मादीने पिल्लांना जन्म दिला असावा, असे ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Leopard attack in Kasarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.