मिळकत व्यवहारांवरील एलबीटी कायम
By Admin | Updated: August 7, 2015 01:10 IST2015-08-07T00:47:24+5:302015-08-07T01:10:10+5:30
घर खरेदी भुर्दंड : तिहेरी करामुळे व्यावसायिक मेटाकुटीस

मिळकत व्यवहारांवरील एलबीटी कायम
नाशिक : राज्य शासनाने गेल्या शनिवारपासून एलबीटी म्हणजेच स्थानिक संस्था करातून ९९ टक्के व्यापारी व्यावसायिकांना आर्थिक निकषावर वगळले असले तरी, घर खरेदी-विक्रीवर एलबीटी कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांना एलबीटीचा भुर्दंड कायम आहे. शासनाकडून ही लूट असून, सर्वसामान्य घर खरेदी करणारा नागरिक त्याखाली भरडला जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने व्यापारी आणि उद्योजकांच्या मागणीनुसार एलबीटी रद्द केल्याचा दावा केला आणि ५० कोटी रुपयांच्या आत उलाढाल असणाऱ्यांपासून त्याला मुक्त केले असले तरी, मिळकत खरेदी- विक्रीवरील मुद्रांकावर एलबीटीचा एक टक्के अधिभार कायम आहे.
राज्य शासनाने ४ फेब्रुवारीस जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार महापालिकांना मुद्रांक अधिभाराव्यतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच एलबीटी कायम ठेवला आहे. त्यामुळे येथे ५० कोटी रुपयांच्या उलाढालीचा निकष पाळलेला नाही, त्यामुळे नागरिकांना घर खरेदी किंवा भूखंड खरेदी-विक्री करताना लागणार भुर्दंड कायम आहे.
भूखंड खरेदी करताना विकासक किंवा नागरिकांना मुद्रांकावर एक टक्का अधिभार भरावा लागतो. त्याच भूखंडावर इमारत बांधताना महापालिकेला एलबीटी भरावा लागतो आणि त्यानंतर सदनिका विकतानादेखील एलबीटी भरावा लागतो. अशा प्रकारचा तिहेरी कर भरावा लागत असल्याने सदनिका मात्र महाग होत आहेत. विकासकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)