लहाडेंच्या जामिनावर गुरुवारी युक्तिवाद
By Admin | Updated: April 26, 2017 01:33 IST2017-04-26T01:33:35+5:302017-04-26T01:33:54+5:30
लहाडेंच्या जामिनावर गुरुवारी युक्तिवाद

लहाडेंच्या जामिनावर गुरुवारी युक्तिवाद
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात दोन पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांच्या जामिनावर सरकारी वकिलांचा गुरुवारी (दि़ २७) युक्तिवाद होणार आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ आऱ शर्मा यांच्या न्यायालयात लहाडे यांच्या वकिलांनी मंगळवारी सुमारे अडीच तास युक्तिवाद केला़; मात्र वेळेअभावी सरकार पक्षाला आपली बाजू मांडता न आल्याने ते गुरुवारी आपली बाजू मांडणार आहेत़
डॉ़ लहाडे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात एमटीपी या कायद्यान्वये तर म्हसरूळ पोलीस ठाण्यात विनानोंदणी दवाखाना सुरू करणे, फसवणूक आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पिंपळगाव बसवंतजवळील उंबरखेड येथील २० आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा बेकायदेशीरपणे लहाडे यांनी गर्भपात केल्याचे चौकशीत समोर आले आहे़
दरम्यान, या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी लहाडे यांनी धाव घेतली आहे़ या दोन्ही गुन्ह्यांतील अर्जावर एकत्रितपणे काम सुरू आहे़ (प्रतिनिधी)