कुंभमेळा : त्र्यंबकेश्वरच्या अहल्या धरणाची अवस्था बिकट
By Admin | Updated: April 18, 2015 23:43 IST2015-04-18T23:35:38+5:302015-04-18T23:43:12+5:30
घाट बांधले,पाण्याचे काय?

कुंभमेळा : त्र्यंबकेश्वरच्या अहल्या धरणाची अवस्था बिकट
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीपर्वणीच्या दिवशी स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अहल्या नदीवर घाट बांधण्यात येत असले तरी, स्नानासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनीच केला आहे. त्र्यंबकेश्वर शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी अहल्या धरण बांधण्यात आले असून, त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या धरणाची साठवण क्षमताही कमी झालेली आहे. सिंहस्थात पाऊस न झाल्यास स्नान कसे होणार, अशी विचारणा केली जात आहे.
त्र्यंबकेश्वर येथे तीन ठिकाणी भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधले जात असून, त्यातील एक मोठा घाट अहल्या नदीवर बांधण्यात आला आहे. ज्या ठिंकाणी घाट आहे, त्याला लागूनच अहल्या धरण आहे. त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अहल्या धरणाचे बांधकाम केल्यानंतर या धरणाकडे आजवर दुर्लक्षच झाले असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाची निम्म्याहून अधिक जागा गाळाने घेतल्याने त्याची साठवण क्षमताही संपली आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेले दरवाजेही मोडकळीस आल्याने पाण्याची गळती होत आहे. धरणाला संरक्षण भिंत नसल्याने त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मद्यपी व टवाळखोरांकडून धरणाच्या पाण्यात घाण टाकली जात असल्याने धरणाचे व पर्यायाने अहल्या नदीचे पावित्र्यही भंग पावले आहे. असे असताना धरणाला लागून घाट बांधण्यापेक्षा या धरणाचीच देखभाल-दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवली, तर त्या पाण्याचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातही धरणानजीक बांधण्यात आलेला घाट हा स्नानासाठी असल्याने धरणात पाणी आले, तरच या घाटाचा उपयोग होऊ शकतो. जर पाऊस पडला नाही तर काय? असा प्रश्नही त्या अनुषंगाने विचारला जात आहे. सध्या या धरणाने तळ गाठला असून, मृत साठा तेवढा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)