कुंभमेळ्यासाठी आता लॉन्स, मंगल कार्यालयांचाही वापर
By Admin | Updated: April 9, 2015 00:40 IST2015-04-09T00:34:37+5:302015-04-09T00:40:52+5:30
पोलिसांची व्यवस्था : भाड्याने जागा घेणार

कुंभमेळ्यासाठी आता लॉन्स, मंगल कार्यालयांचाही वापर
नाशिक : येत्या जून महिन्यापासून होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पंचवटीत औरंगाबाद रोडवरील सुमारे चाळीस लॉन्स-मंगल कार्यालयांचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी या लॉन्स भाडेपट्ट्याने घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.
येत्या जून महिन्यापासून कुंभमेळा सुरू होत आहे. त्यासाठी तपोवनात साधुग्राम तयार करण्यात येत असून, ३२३ एकर क्षेत्रात ६१४ प्लॉट पाडण्यात येणार आहेत. याठिकाणी आखाडे आणि खालशांची व्यवस्था करण्यात येत असली तरी, खासगी धार्मिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याशिवाय परगावाहून येणाऱ्या पोलिसांच्या निवासाचा प्रश्न आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. तपोवनात साधुग्रामजवळ असलेल्या सुमारे चाळीस लॉन्सचा वापर करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात यादी दिली असून, त्याबाबत विचार सुरू आहे. जूनपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत या लॉन्स भाड्याने घेण्याची तयारी सुरू केली आहे.