गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका!

By अझहर शेख | Published: March 1, 2024 05:29 AM2024-03-01T05:29:46+5:302024-03-01T05:29:56+5:30

विष्णू भागवत याने चार वर्षांपुर्वी दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी भागवत यास अटक केली होती. 

Kidnapping of Vishnu Bhagwat who swindled investors out of crores; Nashik police released the Bhagwat brothers within a few hours! | गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका!

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विष्णू भागवतचे अपहरण; नाशिक पोलिसांनी भागवत बंधूंची केली काही तासांत सुटका!

नाशिक : खंडणी उकळण्यासाठी विष्णू रामचंद्र भागवत व त्याचा भाऊ रूपचंद रामचंद्र भागवत यांचे बुधवारी (दि.२८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञातांकडून एका मोटारीतून सीबीएस परिसरातून अपहरण करण्यात आले होते. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेची विविध पथकांनी तपासाची चक्रे वेगवान करत अपहरणाची खात्री पटविली. आरोपी निष्पन्न करून त्यांचा माग काढला असता अपहरणकर्ते गरवारे येथे रूपचंद यांना सोडून विष्णू भागवतला घेऊन फरार झाले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना सुखरूप ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सातपूरमधून एका आरोपीला अटक करण्यास गुरुवारी रात्री पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु आहे

माऊली मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी व संकल्पसिद्धी कंपनीचे संचालक विष्णू भागवत याने चार वर्षांपुर्वी दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या आरोपाखाली नाशिक पोलिसांनी भागवत यास अटक केली होती. 

भागवत बंधूंकडून सुमारे चार कोटी रूपयांची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने अज्ञाताने सुपारी देऊन त्यांचे अपहरण केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. दोघा अपहृतांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. 
मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाची घटना घडली होती. यानंतर पुन्हा पाच महिन्यांत ही दुसरी घटना समोर आली. या दोन्ही घटनांमध्ये नाशिक शहर पोलिसांनी वेगवान तपास करत अपहरणकर्त्यांचा माग काढून अपहृत व्यक्तींची सुरक्षित सुटका केली. 
बुधवारी रात्री सीबीएस येथून विष्णू भागवत व त्यांचा भाऊ रूपचंद भागवत यांना कोणीतरी मोटारीतून बळजबरीने पळवनू नेले होते. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण व सहायक पोलिस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी तातडीने गुन्हे शाखेची पथके तयार करून रवाना केली. घटनास्थळाहूंन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींची नावे निष्पन्न केली. आरोपी वेदांत येवला (२१,रा.नागरे चौक, अशोकनगर) व त्याच्या साथीदारांनी दोघा भागवत बंधूंचे अपहरण केल्याची खात्री पटविली. पथकाने माग काढून येवला यास सातपुरच्या अशोक नगर भागात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.

लोणीमधून विष्णू भागवत यांची सुटका
गुन्हे शाखा युनिट-१च्या पोलिसांचे पथक मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोणी शहरात अपहरणकर्ते विष्णू भागवत यांना सोडून फरार झाले होते. पोलिसांच्या पथकाने गुरूवारी त्यांना लोणी येथून सुखरूप ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तीन लाखांची स्कोडा कार जप्त करण्यात आली आहे. या कारमधून गावठी बनावटीचे पिस्तूल व जीवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहे. त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

कोण आहे विष्णू भागवत?
गुंतवणूकदारांना दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विष्णू भागवत याच्यावर चार वर्षांपुर्वी नाशिक पोलिस आयुक्तालयांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने भागवत यांना अटकदेखील केली होती. सात रेंजरोव्हर कार जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच २७बँक खातीदेखील गोठविण्यात आली हाेती. त्यांच्याविरूद्ध पुणे ग्रामिणच्या हद्दीतही गुन्हे दाखल झाले होते.

Web Title: Kidnapping of Vishnu Bhagwat who swindled investors out of crores; Nashik police released the Bhagwat brothers within a few hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kidnappingअपहरण