देवळा : तालुक्यातील खारीपाडा येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव व संचालक मंडळातील सात सदस्यांनी संगनमत करून अधिकाराचा गैरवापर करत बोगस व खोट्या पावतीच्या आधारे ३५ लाख ६२ हजार ८५६ रुपयांचा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी दिली आहे. तशा आशयाची फिर्याद सहकारी संस्थेचे लेखापरीक्षक नवनाथ अर्जुन बोडके यांनी देवळा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की, तालुक्यातील खारीपाडा येथील अरुणोदय खारीपाडा विविध कार्यकारी सोसायटीत १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान वैधानिक लेखापरीक्षण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नासिक यांनी सहकारी संस्थेच्या आॅनलाइन लेखापरीक्षण वाटप व्यवस्थेनुसार व त्यांच्याकडील दुरुस्ती आदेशाने परंतुक अन्वये लेखापरीक्षण केले असता अपहार झाल्याचे आढळून आले. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.सोसायटीच्या कर्जदार सभासदांनी पाणीटंचाई, पुनर्रचना, साधे अल्प, मध्यम मुदत आदीच्या कर्जापोटी भरणा केलेली रक्कम वसुली रजिष्टर व रोजकिर्दीत जमा न करता कर्जदाराच्या वैयक्तिक खतावणीस जमा रकमेच्या खोट्या नोंदी करून कर्ज खतावणीमधील येणे कर्जबाकी परस्पर कमी करून २६ लाख १५ हजार २९ रुपयांचा तात्कालीन सचिव दत्तात्रेय शंकर आहिरे यांनी अपहार केला आहे. कर्जदारांना खोट्या, बनावट पावत्या देऊन त्यांची फसवणूक केली.