चुंभळे-बोडके यांच्यात खडाजंगी
By Admin | Updated: May 4, 2016 23:34 IST2016-05-04T23:32:30+5:302016-05-04T23:34:46+5:30
स्थायी समिती बैठक : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीवरून वाद

चुंभळे-बोडके यांच्यात खडाजंगी
नाशिक : केवळ आर्थिक मागणी पूर्ण करीत नसल्याने दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या फाईली अध्यक्षांच्या दालनात मंजुरीविना पडून असल्याच्या गोरख बोडके यांच्या आरोपामुळे त्यांच्यात आणि अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. स्थायी समितीच्या बैठकीच्या वेळी जमिनीवर ठाण मांडून बसणाऱ्या बोडके यांनी आपल्याकडे पैशाच्या मागणीचे रेकॉर्डिंग असून, ते ऐकविण्याची तयारी दर्शविल्याने बैठकीत ताण निर्माण झाला. अखेरीस काही पदाधिकाऱ्यांनी बोडके यांना अॅँटीचेंबरमध्ये नेऊन समजूत काढली आणि अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी बैठकीतच ती फाईल मंजूर केल्याने वाद मिटला.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी हा प्रकार घडला. बुधवारी पंचायत राज समिती नाशिकच्या दौऱ्यावर येत असून त्याच्या आदल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण समितीत देवाण-घेवाणीच्या विषयावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या हे विशेष होय.
समितीची बैठक अध्यक्ष चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली; मात्र बोडके यांनी खुर्चीवर न बसता जमिनीवरच ठाण मांडले. त्यांना खुर्चीवर बसण्याची विनंती उपाध्यक्ष प्रकाश वडजे आणि सभापती केदा अहेर यांनी केली; मात्र ग्रामीण भागातील जनतेची कामे होत नाही तोपर्यंत खुर्चीवर बसणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे सर्वप्रथम बोडके यांचा विषय चर्चेला घेण्याचे ठरले. यावेळी बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील कोपरगाव आणि नाशिक तालुक्यातील जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीस सभेने मंजुरी दिली आहे. त्यानंतर या आरोग्य केंद्राच्या
इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. परंतु कोपरगाव येथील फाईलीवर स्वाक्षरी झालेली नाही. अध्यक्षांच्या स्वाक्षरीशिवाय त्यांच्या दालनात फाईल पडून असल्याचा आरोप करतानाच बोडके यांनी आपल्याकडे आर्थिक मागणी झाल्याचा आणि ती पूर्ण न केल्याने फाईली अडवून ठेवल्याचा आरोप केला तसेच यासंदर्भात झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग पुरावे म्हणून आपल्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अनेक गटात खासगी जागेवर सिमेंट प्लग बंधारे देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावर अध्यक्ष चुंभळे यांनी नियोजित आरोग्य केंद्रांची जागा जिल्हा परिषदेच्या नावावर झालेली नाही. यापूर्वी चांदोरी येथील आरोग्य केंद्राबाबत असाच प्रकार घडल्याने निधी परत गेला होता, आता तसे होऊ नये याची काळजी घेत असल्याचा खुलासा केला. मात्र, त्यावरून चुंभळे आणि बोडके यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
बोडके यांनी केलेले आर्थिक मागणीचे आरोप फेटाळून लावले. वाद वाढत असल्याचे बघितल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे आणि गटनेता रवींद्र देवरे त्यांना अध्यक्षांच्या अॅँटी चेंबरमध्ये घेऊन गेले.
सभापती केदा अहेर, प्रशांत देवरे, प्रा. अनिल पाटील, शैलेश सूर्यवंशी, रत्नाकर चुंभळे यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न घालण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास हा प्रकार सुरू होता दरम्यान अध्यक्षांनी बैठक सुरू असतानाच ही फाईल निकाली काढली आणि त्यानंतर आक्रमक बोडके शांत झाले.