कालिदास स्मार्ट, नेहरू उद्यान भकास !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:45 IST2018-07-12T00:45:03+5:302018-07-12T00:45:42+5:30
महाकवी कालिदास कलामंदिराचे रूपडे स्मार्ट झाले असले तरी त्यातील अद्ययावत सुविधांची विशेषत: तांत्रिक साहित्याची चाचणी घेण्याची गरज असून, फुले दालनाचे आता प्रदर्शन केंद्र होऊ देऊ नका, असे साकडे (दि.११) स्मार्ट सिटीच्या कंपन्यांनी अधिकाऱ्यांना घातले आहे.

कालिदास स्मार्ट, नेहरू उद्यान भकास !
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराचे रूपडे स्मार्ट झाले असले तरी त्यातील अद्ययावत सुविधांची विशेषत: तांत्रिक साहित्याची चाचणी घेण्याची गरज असून, फुले दालनाचे आता प्रदर्शन केंद्र होऊ देऊ नका, असे साकडे (दि.११) स्मार्ट सिटीच्या कंपन्यांनी अधिकाऱ्यांना घातले आहे. दरम्यान नेहरू उद्यानाचा मात्र पार्किंगसाठी जागाच नसल्याने त्याचा विकास रोखल्याचे ऐकून महापौरादी मंडळींना धक्काच बसला. असले वाहतूक बेट काय कामाचे असा प्रश्नच सदस्यांनी यावेळी केला. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात होत असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी कंपनीच्या वतीने सदस्यांचा पाहणी दौरा बुधवारी (दि.११) आयोजित केला होता. महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेता दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते त्याचप्रमाणे शाहू खैरे व गुरुमित बग्गा, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यावेळी उपस्थित होते.
विशेष म्हणजे कंपनीच्या दौºयाबाबत ठेकेदार आणि वास्तुविशारद अनभिज्ञ असल्याने पुरेशी माहितीच सदस्यांना मिळू शकली नाही. आयुक्त तुकाराम मुंढेदेखील दौºयात नव्हते. त्यामुळे २० जुलै रोजी समितीच्या बैठकीत यावर जाब विचारण्यात येणार असल्याचे सदस्यांनी सांगितले. महाकवी कालिदास कलामंदिराचे रूपडे पालटले असून त्याचे काम चांगले असून, खुर्च्याही आरामदायी आहेत. मात्र आसनक्षमता कमी झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल साउंड सिस्टीमवर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. अॅकॉस्टीक तसेच वातानुकूलन यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. आज रिक्त सभागृहात त्याची परिणामकारकता दिसली असली तरी प्रत्यक्षात मात्र एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याची चाचणी घेण्याची गरज यावेळी शाहू खैरे व बोरस्ते यांनी व्यक्त केली. या चाचणीनंतरच त्याचा महापालिकेने ताबा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. महात्मा फुले दालनलाही आधुनिकतेचा साज करण्यात आला असून, पहिल्या माळ्यावर कलादालन साकारताना त्यासाठी फ्रेम्सदेखील साकारण्यात आल्या आहेत. तळमजल्यावर यापूर्वी कपड्यांची प्रदर्शने भरवली जात होती. तेथे छोटेखानी सभागृह साकारण्यात आले असून, आता तेथे कपड्यांचे प्रदर्शन भरूवून रया घालवू नका, असा सल्लादेखील देण्यात आला. दरम्यान, नेहरू उद्यानात कायापालट तर काही नाहीच उलट उद्यान भकास असल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या उद्यानाजवळ पार्किंगसाठी जागाच नसल्याने त्याचा विकास करण्यात आला नसल्याचे अधिकाºयांनी सांगितल्यानंतर मग नेहरू उद्यान स्मार्ट सिटीत कशासाठी घेण्यात आले, असा प्रश्न सदस्यांनी केला. उद्यानाभोवती अतिक्रमणे हटविली जात नाही. त्यामुळे विकास नाही, मुळात उद्यान चांगले असतील तर लोक येतील त्यामुळे अतिक्रमणे टळतील, असे मत सदस्यांनी व्यक्त केले. उद्यानाऐवजी नेहरू उद्यानाचे वाहतूक बेट झाल्याची टिप्पणी यावेळी सदस्यांनी केली.
दौ-यात आयुक्तच नाहीत, अपुरी माहिती
स्मार्ट सिटीच्या दौºयाची पत्रे सदस्यांना अगोदरच पाठविली असली तरी प्रशासनाच्या वतीने संबंधित कामाच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीचे अधिकारी तसेच आर्किटेक्ट असे कोणासही बोलविण्यात आले नव्हते. त्यामुळे पुरेशी माहिती मिळत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आयुक्त तुकाराम मुंढे या दौºयात नसल्यानेदेखील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. दौºयाच्या दरम्यान पाऊस असल्याने तसेच अपुरी माहिती मिळत असल्याने अमरधामच्या ठिकाणी जाण्यास सदस्यांनी टाळले. पुढील दौ-यात अमरधाम बरोबरच त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभदरम्यानच्या स्मार्टरोडच्या कामाचीदेखील सदस्य पाहणी करणार आहेत.
उद्घाटनावरून खदखद
महाकवी कालिदास कलामंदिर आणि महात्मा फुले कलादालनाच्या उद्घाटनाच्या मुहूर्तावरूनही यावेळी चर्चा झाली. या दोन्ही वास्तू आपल्या प्रभागात येत असून, आपल्याला विश्वासात घेऊनच उद्घाटन झाले पाहिजे, असे शाहू खैरे यांनी महापौरांना सुनावले. तर येत्या १३ तारखेला कालिदास दिन असून, त्या दिवशी कलामंदिराचे उद्घाटन होणे औचित्याला धरून झाले असते, असे अजय बोरस्ते यांनी सांगितले.