छावा संघटनेचे दिल्लीत जंतरमंतरवर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 18:21 IST2018-12-27T18:21:03+5:302018-12-27T18:21:33+5:30
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे.

दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले छावा संघटनेचे किशोर चव्हाण, विलास पांगारकर, राजेंद्र ढाकेपाटील, अशोक खानापुरे, प्रदीप बिल्होरे, भाऊसाहेब बैरागी, संपत पगार आदी.
सिन्नर : मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे. आरक्षणाच्या मागणीचे निवेदन केंद्रीय न्याय आणि अधिकारिता मंत्री थवरचंद्र गेहलोत यांना देण्यात आले आहे.
मराठा आरक्षण हे इतर मागास प्रवर्गात देण्यासाठी ४ आॅगस्ट २०१६ रोजी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषण केले होते. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मंत्री गेहलोत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर इतर मागासवर्गाच्या सचिवांना यासंबंधी पत्र दिले होते. मात्र, तीन वर्षांनंतरही आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मागासवर्ग आयोगाकडे याबाबत बाजू मांडण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांच्या वतीने करण्यात आली आहे.
उपोषणात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, राजेंद्र ढाकेपाटील, अशोक खानापुरे, प्रदीप बिल्होरे, योगेश केवारे, परमेश्वर नलावडे, विजय काकडे, संपत पगार, निखिल पांगारकर, योगेश शिंदे, संपत पगार, रोहित दहिहंडे, भाऊसाहेब बैरागी, अंबादास काचोळे, सागर जगताप आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.