जलहक्क समितीद्वारे जनजागर अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:26 IST2020-12-17T21:17:12+5:302020-12-18T00:26:32+5:30
नादंगाव : तालुक्याचे सिंचन क्षेत्र अवघे ५ टक्के असणे हे शासन-प्रशासन आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूषणावह नसून, याबाबत जलहक्क समितीने नाराजी व्यक्त करून राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे. तालुक्यातील राजकीय आणि एकूणच सर्व क्षेत्रातील उदासीनता दूर हटविणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांनी सजगतेने प्रत्येक गावातून पुढे यावे म्हणून तालुका जलहक्क समितीद्वारे जनजागरण अभियान राबविण्याचा निर्णय गुरुवारी (दि.१७) झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

जलहक्क समितीद्वारे जनजागर अभियान
येथील विश्रामगृह प्रांगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवृत्ती खालकर यांच्या अध्यक्षतेखाली जलहक्क समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा आणि ह्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या २० शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले यांनी प्रास्ताविकात जलहक्क समितीच्या कामाचा आढावा घेतला.
नार-पार तथा मांजरपाडा-१ (देवसाने) प्रकल्पाचे अभ्यासक अंबादास मोरे यांनी सविस्तर विवेचन व मार्गदर्शन केले. देवीदास देवरे यांनी गावोगावी तरुणांशी सुसंवाद साधून केंद्र उभारण्याची केलेली सूचना सर्वमान्य करण्यात आली. शेतकरी-तरुणांसाठी १ दिवसाचे शिबिराचे आयोजन करणे, प्रकल्पासंदर्भात पुस्तिका प्रसिद्ध करणे आणि जलसंपदामंत्र्याकडे तसेच जिल्हाधिकारी तथा तापी विकास महामंडळापर्यंत नांदगाव तालुक्याचा पाणीप्रश्न मांडण्याबाबत निर्णय घेण्यात आलेत. ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक परदेशी यांनी सूत्रसंचलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मच्छींद्र वाघ, सुदाम काळे, जनार्दन पवार, गोरख चव्हाण, मनमाड बचावाचे योगेश बोदडे, राजेश खालकर, अप्पा झाल्टे,अमोल शेलार,राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय चव्हाण, दिगंबर कवडे व इतर कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग दिला.