Jailroad was hit by rain; Precipitation forecast for Monday | जेलरोडला पावसाने झोडपले; सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज

जेलरोडला पावसाने झोडपले; सोमवारी मुसळधार पावसाचा अंदाज

ठळक मुद्देगंगापूर धरणात ९६ टक्के जलसाठागंगापूर धरणातून थांबलेला विसर्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता

नाशिक : पंधरवड्यापासून विश्रांती घेतलेला पाऊस उत्तर व मध्य महाराष्टÑात पुन्हा हजेरी लावण्याची शक्यता आहे. मुंबईच्या कु लाबा वेधशाळेने सोमवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्यातील घाटप्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शहरातही मध्यम स्वरूपाच्या सरींचा वर्षाव होऊ शकतो, दरम्यान, रविवारी (दि.२५) दुपारी दीड तास जेलरोड परिसराला जोरदार पावसाने झोडपले.
चालूू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाचा साठा ९० अंशापर्यंत पोहचला होता. परिणामी गोदावरीत मोठा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरीला या हंगामात महापूर आल्याची नोंद झाली. मागील पंधरवड्यापासून पावासाने उघडीप दिली असून प्रखर ऊन शहर व परिसरात पडू लागले आहे. त्यामुळे पुन्हा वातावरणात उष्णता जाणवण्यास सुरूवात झाली. दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास जाड सरींचा शहराच्या काही भागात शिडकावा झाला; मात्र रविवारी दुपारी जेलरोड परिसरात साधारणत: दीड तास जोरदार पाऊस सुरू होता. येथील रस्ते जलमय झाले होते. जेलरोड, नाशिकरोड, सिन्नरफाटा, दसकचा परिसर वगळता अन्य भागांमध्ये मात्र ऊन पडलेले होते.
दरम्यान, रविवारी दुपारी कुलाबा वेधशाळेच्या हवामान विभागाकडून उत्तर व मध्य महाराष्टÑात सोमवारी जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली गेली. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांतील घाट प्रदेश असलेल्या भागात मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गंगापूर धरणात ९६ टक्के जलसाठा असून त्र्यंबक, अंबोलीच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी जोर‘धार’ झाल्यास पुन्हा गंगापूर धरणातून थांबलेला विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jailroad was hit by rain; Precipitation forecast for Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.