इकबाल कासकर, छोटा शकीलच्या खटल्यात नाशिक चे सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 17:10 IST2019-07-03T17:04:32+5:302019-07-03T17:10:49+5:30
या गुन्ह्यात कासकर पोलिसांच्या तावडीत असला तरी छोटा शकीलसह त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. खटल्याकामी गृह खात्याने विधी व न्याय विभागाशी विचारविनियमय करून नाशिक जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय सुहास मिसर यांची शासनाने नियुक्ती केली आहे.

इकबाल कासकर, छोटा शकीलच्या खटल्यात नाशिक चे सरकारी वकील अजय मिसर यांची नियुक्ती
नाशिक : कुविख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम कासकर याचा भाऊ इकबाल कासकर, छोटा शकील यांच्याविरूध्द ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७साली खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या खटल्याच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे. या गुन्ह्यात कासकर पोलिसांच्या तावडीत असला तरी छोटा शकीलसह त्याचे काही साथीदार अद्याप फरार आहेत. खटल्याकामी गृह खात्याने विधी व न्याय विभागाशी विचारविनियमय करून नाशिक जिल्ह्याचे विशेष सरकारी वकील अजय सुहास मिसर यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
इकबाल, इसरार सय्यद, मुमताज शेख उर्फ राजू, पंकज जगसी गंगर तसेच संघटीत गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या फरार संशयित आरोपी शकील शेख उर्फ छोटा शकील शमी अंसारी, गुड्डु व त्यांचे साथीदार यांनी वर्चस्व निर्माण करण्यासाठी दहशत पसरवून खंडणी वसूलीचा प्रयत्न केल्याबाबत ठाणे येथील गुन्हे शाखेने त्यांच्याविरूध्द कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अनेक तांत्रिक बाबी व संघटित गुन्हेगारी टोळींचे एकमेकांवरील वर्चस्व, व्हायरल कम्युनिकेशन, व्हाइपफोनचा वापर आदि तांत्रिक बाबी निष्पन्न झाल्या आहेत. या बाबी सिध्द करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तांनी शासनाकडे विशेष सरकारी वकीलांची या खटल्यासाठी नेमणूक करण्याची विनंती केली होती. गृह विभागाने विधी व न्याय विभागासोबत चर्चा करून मिसर यांची शासनाकडून सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
----
कासकर दाऊदचा मुख्य हस्तक
खंडणी वसूलीच्या गुन्ह्यात दाऊदचा मुख्य हस्तक सराईत गुन्हेगार इकबाल कासकर यास गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी अटक केली आहे. त्याचा या गुन्ह्यातील सहभाग महत्त्वाचा आहे. म्होरक्या छोटा शकील अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच दाऊद इब्राहीम यास भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर या खटल्याकामी मिसर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या खटल्याच्या निकालाकडे अवघ्या महाराष्टÑासह पोलीस दलाचे लक्ष लागून आहे.