शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे पोर्टल सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:10 IST2020-01-24T23:30:58+5:302020-01-25T00:10:33+5:30
आंतरजिल्हा बदलीने बदलून जाऊ पाहणारे अथवा नाशिक जिल्ह्णात बदली करून घेण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने आॅनलाइन पोर्टल सुरू केले असून, बदली पात्र शिक्षकांसाठी दि. १० फेब्रुवारीपर्यंत सदरची सुविधा सुरू राहणार आहे.

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे पोर्टल सुरू
नाशिक : आंतरजिल्हा बदलीने बदलून जाऊ पाहणारे अथवा नाशिक जिल्ह्णात बदली करून घेण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने आॅनलाइन पोर्टल सुरू केले असून, बदली पात्र शिक्षकांसाठी दि. १० फेब्रुवारीपर्यंत सदरची सुविधा सुरू राहणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये चालणारा गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन करण्यास सुरुवात केली असून, त्यात आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचाही समावेश करण्यात आला आहे.
यंदादेखील शासनाकडून तिच पद्धती अवलंबली जाणार असल्याने त्याची सुरुवात आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांपासून करण्यात आली आहे. त्यासाठी दि.१९ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान शिक्षकांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अशा बदल्यांमध्ये मात्र १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदेतून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी भरलेले अर्ज डिलिट करण्यात आलेले असून, ज्या शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बदल्यातील गैरप्रकारांना थारा नाही
आॅनलाइन बदल्यांमुळे बदलीपात्र झालेल्या शिक्षकांना त्यांच्या सोयीनुसार समुपदेशाने बदली केली जाते. त्यासाठी सर्व शिक्षकांची माहिती अगोदर त्यात भरली जाते व जे शिक्षक बदलीसाठी पात्र ठरू शकतात अशांच्याच बदल्यांना मुभा असते. त्यामुळे बदल्यांमध्ये मनमानी अथवा गैरप्रकाराला कुठलाही थारा मिळत नाही.